धरणगाव । लग्न म्हटले की आजकाल आपल्या आर्थिक स्थैर्याचा बडेजावपणा मिरवला जातो. लग्नाच्या नावावर लाखो रुपयांची उधळपट्टी अवघ्या एका दिवसात उरकली जाते. परंतु या बडेजावपणाला फाटा देत एक आदर्श विवाह नुकताच चाळीसगावात पार पडला. मराठा समाजातील चालीरितींना फाटा देत, लग्न पत्रिका न छापता एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि लग्न सोहळा असे सर्व विधी उरकत समाजात बिना हुंड्याने आदर्श विवाह रविवार 7 मे रोजी चाळीसगाव येथे पार पडला.
वधुवरांना समाज बांधवांसह मान्यवरांनी दिले आशिर्वाद
एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच समाज बांधवांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाहामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. धरणगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक (आप्पासाहेब) भिका आनंदा जाधव यांचा लहान मुलगा राहुल याचा विवाह चाळीसगाव येथील रहिवाशी राजेंद्र पुंडलीक पाटील यांची कन्या दिपीका हिच्याशी ठरला होता. मुलीच्या कुटुंबाची परिस्थिती साधारण आहे.
तेव्हा दोन्ही कुटुंबातील प्रमुखांनी विचारांती लग्न समारंभात होणारा खर्च वेळेच्या अपव्यय टाळण्यासाठी जुन्या पध्दतीला तिलांजली देऊन सर्व लग्नविधी करण्यास दोन्ही परिवार तयार झाले.त्यानुसार 7 मे ही तारीख निश्चिती करून चाळीसगाव येथील गणेश मंगल कार्यालयात हिरापुर रोड येथे सर्वप्रथम साखरपुडा, नंतर वधु-वराला हळद लावण्यासह बोहल्यावर चढवून नवरदेव-नवरीने एकामेकांच्या गळ्यात हार टाकुन साधेपणाने लग्नसोहळा मराठा समाजातील मान्यवरांसमक्ष आटोपला.
मान्यवरांची होती उपस्थिती
विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांनी लग्नपत्रिका छापल्या नाहीत. जवळच्या नातेवाईकांना व इतर मित्र परिवारांस फक्त भ्रमणध्वनीवरून सोहळ्याचा निरोप देण्यात आला. लग्नसोहळ्यास उपस्थित असलेल्या अनेक मान्यवर मित्रपरिवार नगरसेवक, राजकीय पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका व इंदिरा कन्या शाळा संस्थापक व अध्यक्ष डी.जी. पाटील व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील यांची या सोहळ्यास उपस्थिती होती.