धरणगाव। मे महिन्याच्या तापमनाने उच्चांक गाठला आहे. उन्हाच्या तीव्रतेने जीवाची लाही लाही होतांना सध्या दिसत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हे एक उपाय आहे. उन्हात सर्वत्र पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी समाजसेवी संघटना, तसेच समाज सेवकांकडून मोफत पाणपोई लावण्यात येते. शासकीय कार्यालये, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रवाशांसाठी रेल्वे स्थानक परिसरात पाणी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध केले आहे. नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. मात्र धरणगाव रेल्वे स्थानक परिसरात शुध्द पाणी तर नाहीच नाही साधा पाणी देखील प्रवाशांसाठी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने प्रवांशाचे हाल होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
मॉडेल स्थानकाचा दर्जा
देशातील रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारावा यासाठी रेल्वे प्रशासन उपाययोजन करत आहे. प्रवाशांच्या सोयी करीता सर्व सुविधा रेल्वे प्रशासन पुरवित आहे. धरणगाव रेल्वे स्थानकच हे जुने असून या रेल्वे स्थानकाचे कायापलट झाला आहे. हे स्थानक मॉडल स्थानक मानले जाते. रेल्वे मंत्रालयाने धरणगाव रेल्वे स्थानकाला ‘क’ वर्गाचा दर्जा जाहिर केला आहे.
प्लॅटफॉर्मचे काम निकृष्ट
धरणगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 चे काम निकृष्ट पध्दतीने झालेले आहे. प्लॅटफॉर्मला लागुन रस्ता तयार करणे गरजेचे होते मात्र ते होत नसल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए.टी पाटिल यांनी विशेष लक्ष्य देऊन काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नवजीवनला थांब्याची मागणी
धरणगाव रेल्वे स्थानक हे सुरत मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. सुरतला जाणार्या तसेच येणार्या बहुतांश रेल्वे या ठिकाणी थांबा घेतात. नवजीवन एक्सप्रेसला देखील धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून 12 वर्षापासून होत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहे. खासदार ए.टी.पाटील यांच्या मार्फत वारंवार निवेदन देण्यात आले आहे. मात्र हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडले आहे.