धरणगाव। गेल्या काही दिवसांपासून धरणगाव शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ऐन उन्हाळ्यात जनतेचे हाल होत आहेत. सणासुदीच्या काळातील खंडित वीज पुरवठ्यामुळे महावितरण कंपनीतील कर्मचार्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून भर उन्हात बाहेर पडणे धोकादायक ठरू शकते. तसेच शेतकरी दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी विसावा घेत असतो. परंतु यावेळी नेमका विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनता त्रस्त झालेली दिसून येते. विजेच्या पुरवठ्याबाबत कर्मचार्यांनादेखील योग्य ती माहिती नसते व कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात. अश्या वेळेस शाब्दिक चकमकदेखील होत असते.
वारंवार होणार्या या घटनांना महावितरण गंभीरतेने घेतांना दिसून येत नाही तरी तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन यावेळी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर पाटील, पुनिलाल महाजन, शहराध्यक्ष सुनील वाणी, नगरपालिका गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे, कडू बयस, सुनील चौधरी, संजय कोठारी, टोनी महाजन, जितेंद्र चौधरी, जितेंद्र महाजन, योगेश वाघ, पापा वाघरे, डोंगर चौधरी, आबा पाटील, अनिल महाजन, राजू महाजन, मुकेश चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात अनेक ठिकाणीपूर्वी टाकण्यात आलेल्या तार या जीर्ण झाल्या आहेत, अनेक वेळा रस्त्यातील झाडांची छाटणी न केल्याने तारांना स्पर्श होवून देखील विद्युत पुरवठा खंडित होत असतो. या जीर्ण झालेल्या तारा त्वरित बदलविण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील या खंडित होणार्या वीज पुरवठ्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना जाब विचारण्यात आला. ऐन सणासुदीच्या काळात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची कारणे यावेळी विचारण्यात आली. काही दिवसांपूर्वी महात्मा फुले जयंती निमित्त शोभायात्रेच्या दिवशी रात्रीच्या वेळी जवळपास दीड तास विद्युत पुरवठा खंडित होता. रामलीला मंडळातर्फे अक्षय तृतीया निमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या रामायणावर आधारित रामलीला या कार्यक्रमावेळी देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यत्यय येत होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी देखील हीच परिस्थिती दिसून आली. या सर्व विषयांमुळे जनतेत असंतोषाचे वातावरण आहे. जनतेला होणार्या या त्रासापासून आपण त्वरित सुटका करावी.