धरणग्रस्तांना मोबदला, पाण्याचा जमिनींना लाभ द्या

0

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील वडिवळे धरणाच्या चार्‍या व उपचार्‍यांची त्वरित दुरुस्ती करून त्याभागातील शेतीला पाणीपुरवठा करावा. आंदरमावळातील टाटा धरणातील उचल पाणी परवाने तेथील शेतकर्‍यांना त्वरित द्यावेत, या धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचे मोबदले शेतकर्‍यांना मिळावेत अशा आशयाच्या मागणीचे निवेदन समांतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. ही माहिती समांतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माऊली दाभाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

…तर दोन हजार एकर जमीन ओलीताखाली
वडिवळे धरण पूर्ण झालेले असून या धरणापासून चार्‍या व उपचार्‍या काढलेल्या आहेत त्या नादुरुस्त असून धरणाच्या पाटापासून 4 ते 5 किलोमीटर बंद पाईपातून पाणी नेण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र, या बंद पाईपचे व्हॉल्व न बसविल्याने शेतकर्‍यांना पाणी मिळत नाही ते त्वरित बसवून त्या विभागातील शेतीला पाणी पुरवठा करावा. तसेच तेथील चार्‍या व उपचार्‍याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी दाभाडे यांनी निवेदनात केली आहे. यामुळे गोवित्री, साबळेवाडी, करंजगाव, काब्रे, नाणे, नानोली, साई आदी गावामधील सुमारे 2000 एकर जमीन पाण्याखाली येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

…विविध मागण्यांचा समावेश
सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनावर नारायण ठाकर, कैलास गायकवाड, शांताराम लष्करी, दत्तात्रय पडवळ, विठ्ठल जाधव, शरद जाधव, नवनाथ पडवळ, शांताराम पडवळ, एकनाथ गायकवाड, रामभाऊ पडवळ, बाळासाहेब शेटे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. आंदरमावळातील टाटा धरणातील पाणी उचलण्यासाठी लागणारे पाणी परवाने शेतकर्‍यांना त्वरित देण्यात यावे तसेच आंद्र धरणासाठी संपादित केलेल्या काही शेतकर्‍यांच्या जमिनीचे मोबदले शासनाकडून देणे बाकी आहे त्यांना ते त्वरित देण्यात यावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली.