धरणांचा पाणीसाठा वाढला

0

पुणे । जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोर्‍यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात 24.36 टक्के (3.04 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.

सहा दिवसांत 15.48 टक्के वाढ
आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो. आदिवासी भागातील ओढे, नाले भरून वाहत आहे. बुब्रा व घोड नदी दुथडी भरून वाहत आहेत. 7 जुलै रोजी धरणात 8.88 टक्के पाणीसाठा होता. सहा दिवसांत धरणातील साठ्यात 15.48 टक्के वाढ झाली आहे. डिंभे धरण क्षेत्रात 336 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पोखरी घाटातून दिसणारा गोहे पाझर तलाव भरून वाहत आहे. यामुळे घोड नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. आदिवासी भागातील भातलावणी अंतिम टप्प्यात आहे. 6500 हेक्टर क्षेत्रापैकी 5500 हेक्टर क्षेत्रात भातलावणी पूर्ण झाली आहे. या आठवड्यात भातलावणी पूर्ण होईल.

 टेमघर, वरसगाव, पानशेत आणि पिंपरी- चिंचवडला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या क्षेत्रात जूनपासून 900 ते 1200 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी सहापर्यंत धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला.