धरणांनी गाठला तळ

0

पुणे । भिमा खोर्‍यातील धरणांनी तळ गाठला आहे. भिमा खोर्‍यातील 25 धरणांमध्ये फक्त 33.42 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पात 6.63 टीएमसी तर पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणामध्ये 2.60 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये फक्त 1.91 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.पिंपरी-चिंचवड शहराला मावळ तालुक्तातील पवना धरणामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. पवना धरणामध्ये 30 टक्के म्हणजे 2.60 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये 22.74 टक्के म्हणजे 6.63 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट
पुणे जिल्ह्यातील धरणांचा समावेश हा भिमा खोर्‍यामध्ये होतो. भिमा खोर्‍यामध्ये पिंपळगाव-जोगे, माणिकडोह, डिंभे, भासा-आसखेड, चासकमान, मुळशी, भाटघर, वीर, निरा-देवधर, गुंजवणी, उजनी आदींसह 25 धरणांचा समावेश होता. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. सध्या काही धरणांमधून शेतीसाठी आवर्तन सोडले जात आहे. उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असल्याने होणारे बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे.