भुसावळ : शहराची पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या अमृत योजनेतून नव्याने पाणी पुरवठा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याबाबत सोमवार 26 रोजी दुपारी नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांच्या दालनात महत्वपुर्ण बैठक झाली या बैठकित आमदार संजय सावकारे यांनी पाण्याची उचल करण्यासाठी रेल्वेच्या बंधार्यावर अवलंबून न राहता पालिकेचा स्वतंत्र बंधारा असल्यास देखभाल दुरूस्ती सुलभ होईल असे सुचविले आहे. अमृत योजना हि 600 कोटी रुपयांची आहे. या बैठकित शासनातर्फे पिंप्रीसेकम येथून तापी पात्रातील बंधार्यासह हतनूर धरणातून जलवाहिनी टाकून पाणी घ्यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. हतनूर धरणातून थेट जवाहिनी टाकून पाणी आणण्यासाठी 35 ते 40 किमी जलवाहिनी टाकावी लागेल. तर पिंप्रीसेकमच्या बंधार्यातुन पाणी घेण्यासाठी 15 किमी पर्यंत जलवाहिनी टाकावी लागेल. दोन्ही ठिकाणाहून पाणी घेण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकावी लागेल तसेच यासाठी अधिक खर्च व मनुष्यबळ लागणार आहे. पिंप्रीसेकम येथून 28 हजार दलघमी व रेल्वेच्या बंधार्यातुन 12 दलघमी पाणी घ्यावे असे सुचविण्यात आले.
मुबलक प्रमाणात पाणी साठणार
नविन बंधार्यामुळे तापी पात्रात मुबलक पाणी साठेल यासाठी पुलाच्या पश्चिम बाजुला बंधारा बांधणे योग्य होईल. हतनूर धरणाच्या पाण्याचा एक स्त्रोत नगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहेच पण हा बंधारा बांधला गेला आणि शेळगाव बॅरेज प्रकल्प पुर्ण झाल्यास याचा लाभ अधिक होईल. यामुळे पालिकेला स्वत:चा बंधारा खर्च व देखभालीच्या दृष्टीने फायद्याचा राहिल असा प्रस्ताव दिला असून अधिकार्यांनी सकारात्कता दर्शवली आहे. यावेळी नगरविकास सचिव, जिवन प्राधिकरणचे संतोष कुमार, मुख्य अभियंता, आमदार सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, निवृत्त पाणी पुरवठा अभियंता ए.बी. चौधरी उपस्थित होते. आमदार सावकारे यांनी दिलेला प्रस्ताव एसएलपीपी कमेटीसमोर जाऊन मंजुरी मिळाल्या नंतर योजना मंजुर झाली असल्याचे पत्र महिना भरात मिळू शकेल.
40 दलघमी पाणी घेता येणार
आमदार संजय सावकारे यांनी दोन्ही ठिकाणाहून पाणी घेतले गेल्यास ते खर्चिक व देखभालीसाठी जटील आहे. यासाठी अधिक मनुष्य बळाची गरज भासेल तसेच पैसा व मनुष्यबळ अधिक खर्च होईल असे सांगितले. यापेक्षा नगरपालिकेचा स्वतंत्र बंधारा बांधला गेल्यास त्यातुनच 40 दलघमी पाणी घेता येईल. देखभालीसाठी खर्च सुध्दा कमी लागले. पाणी जलशुध्दीकरण केंद्रापर्यत नेण्यासाठी 1 कि.मी. नवीन जलवाहिनीची गरज भासेल.
135 लीटर पाणी मिळणार
केंद्र शासनाच्या या योजनेत राज्यातील 43 शहरांमध्ये भुसावळ पालिकेचा समावेश करण्यात आला असून 2048 च्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करुन ही योजना उभारण्यात येत आहे.ही योजना कार्यान्वीत झाल्यास दरडोई 135 लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रतिदिन 2 कोटी 53 लाख 55 हजार लिटर पाण्याची आवश्यकता असणार आहे. पालिका प्रशासन सध्या रेल्वेच्या बंधा-यातुन पाणी घेत आहे परंतु त्यात हतनुरचे आवर्तन सोडल्या नंतर 30 ते 35 दिवस शहराला पाणी पुरेल एवढाच साठा असतो.