धरणीचा पान्हाही आटू लागला

0

भुसावळ । एप्रिल महिन्याच्या मध्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्यातील जलाशयातील साठाही दिवेसंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होण्याची भिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणारी तापी नदीचे पाणी आटल्यामुळे काठालगत असलेल्या कंडारी गावातच दोन ते तीन दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. बहुतांश गावातील विहीरीच्या पार्‍याची पातळी खाली गेली असून अनेक ठिकाणच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावेह लागत आहे. अनेक गावातील हॅन्डपंपमधून पाणी येणे बंद झाले आहे. नद्या नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट व्हायला लागली आहे. पाण्याचे साठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत आहे.

शेतकरी पडले चिंतेत
यावर्षी मार्च महिन्यापासूनच उष्णतेचा पारा वाढायला लागला. वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील विहीरींची पाण्याची पातळी खालावली असून नदी नाल्यांचे पात्रही कोरडे पडू लागले आहे. परिणामी गावाच्या शिवारात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. हिच परिस्थिती वैरणाची झाली असून वाढत्या तापमानामुळे शेतकर्‍यांजवळ जनावरांना पिण्यासाठीं पाणी व वैरण नाही. त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय? या चिंतेने तालुक्यातील शेतकर्‍यांना ग्रासले आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरीप हंगामात शेतीच्या लागवडीसाठी लागणार्‍या बी- बियाणे खरेदीला पैसे नाहीत त्यातच हि समस्या निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आतापासून पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.

पशुपालकांना भेडसावू लागला जनावरांसाठी चार्‍याचा प्रश्‍न
पाणी समस्या निवारणासाठी शासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी बर्‍याचशा ठिकाणी आड्यात नाही तर पोहर्‍याच येणार कुठून असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानाने आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आणखी खाली जात असून जलाशयातील पाण्याचा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सुर्य आग ओकू लागल्यामुळे पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी वैरण नसल्यामुळे शेतकरी आपले धष्ट पुष्ट जनावरे विकण्याच्या तयारीला लागले आहेत.

पाण्याचा काटकरीने वापर व्हावा
जलसाठ्यात घट येत असल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रुप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी गुरांना धुण्यासाठी तसेच गोठ्याच्या सफाईसाठी देखील पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे पशुपालकांनी पाण्याचा अपव्यय न करता आवश्यक तेवढेच पाणी वापरावे तसेच शेतात चारीने पाणी न सोडता ठिबक संचाचा वापर केल्यास कमीत कमी पाण्यात पिकांना पाणी मिळून चांगले उत्पादन मिळू शकते.