नवी दिल्ली-नायब राज्यपालांच्या घरात ९ दिवस केलेल्या धरणे आंदोलनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडले आहेत. त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बुधवारी त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या सर्व बैठकाही रद्द केल्या.
अरविंद केजरीवाल बंगळुरूला उपचारासाठी जाणार आहेत. गुरूवारी ते १० दिवसांसाठी बंगळुरुच्या नॅचरोपेथी सेंटरमध्ये उपचारासाठी रवाना होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायब राज्यपालांच्या घरात केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर केजरीवालांची प्रकृती ढासळली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण ४०० पर्यंत पोहोचलं आहे. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केजरीवाल बंगळुरूला जाणार आहेत.
यापूर्वी खोकल्याच्या त्रासावर उपचार घेण्यासाठीही केजरीवाल बंगळुरूला गेले होते. केजरीवाल यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या संपाविरोधात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि गोपाल राय यांच्यासह ९ दिवस धरणे धरले होते.