भुसावळ विभागात पाऊस कायम ; हतनूरचे 41 गेट अद्यापही उघडेच ; तापी काठांवर सतर्कतेचा इशारा
भुसावळ- सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस कायम असल्याने गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धरणाचे उघडलेले 41 दरवाजे दुसर्या दिवशीही शुक्रवारी कायम उघडेच होते तर पावसामुळे भुसावळ शहरातील अनेक जुन्या इमारतींसह घरांची पडझड झाली. बोदवड तालुक्यातील नाडगाव येथेही घरे कोसळली मात्र सुदैवाने प्राणहानी टळली तसेच रावेर तालुक्यात धरणे फुल्ल भरल्याने शेतकरी आनंदले आहेत.
भुसावळात वृक्ष उन्मळले
शहरात तीन दिवसांपासून संततधार सुरू असून शहर आणि तालुक्यात 24 तासात 209.6 मिली पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी शहरातील खाल्लम्मा दर्गा परीसर आणि जामनेर रोडवरील संजीवनी मेडीकल जवळ वृक्ष उन्मळून पडले.
हतनूरचे 41 दरवाजे उघडेच
हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडे असून तापी नदीला पूर कायम असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रातील गोपाळखेडा, लोहारा, देडतलाई, टेक्सा, चिखलदरा व बर्हाणपूर आदी सर्व पर्जन्यमापक स्थानकांवर गुरुवारी दुपारी 12.30 ते शुक्रवारी सकाळी सात वाजेदरम्यान 24 तासांमध्ये 569 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धरणाची लेव्हल 210.600 मीटर तर साठा 220.40 क्यूमेक्स (33.33 टक्के) असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रावेरसह यावल नद्यांना पूर ः धरणांमध्ये वाढला जलसाठा
यावल शहरातील हडकाई-खडकाई (हरीता-सरीता) नद्यांना प्रथमच पूर आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले तर पावसामुळे हरीपूरा धरण 75 टक्के भरले असून भोनक नदीला पूर आला तर सातपुड्यातील पावसामुळे मोर धरणात जलसाठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शिवाय निंबादेवी धरणदेखील फुल्ल भरल्याने शेतकर्यांमध्ये आनंद पसरला आहे. जलक्रांती अभियानातून झालेल्या कामांमुळे शेतशिवारातील विहिरींची जलपातळी वाढल्यानेही शेतकर्यांमध्ये आनंदाचे लहर पसरली आहे.
संततधार पावसाने नाडगावमध्ये घर कोसळले
बोदवड- तालुक्यात सलग 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील नाडगाव येथील सारगंधर रंजनसिंग पाटील व पानकाबाई व्यकंटराव पाटील यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या. या घटनेमुळे घरातील अनेक संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. सारंगधर पाटील व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांना घटना लक्षात येताच त्यांनी घरातील सदस्यांना बाहेर काढले. या दुर्घटनेत सारंगधर पाटील यांच्या घराचे अंदाजे 80 हजारांचे तर पानकाबाई पाटील यांचे अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रावेर तालुक्यात धरणे ओसंडली
रावेर– तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुकी, मंगरुळ, मात्राण व आभोडा धरण शंभर टक्के भरल्याने शेतकरी सुखावले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही धरणे फुल्ल भरल्यानंतर सांडव्यावरून सुमारे दोन फुटांनी वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली आहे. रावेर तालुक्यासह आदिवासी भागात पावसाची संततधार दोन दिवसांपासून सुरू आहे तर आदिवासी भागासह मध्यप्रदेशातदेचील मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणे भरल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याचे यंदा केळी पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाण्याची शक्यता केर्हाळा सरपंच तथा शेतकरी राहुल पाटील यांनी वर्तवली. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा दुष्काळ जाहीर करावा लागला होता. विहिरीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड घट झाल्याने पाण्याअभावी हजारो हेक्टर केळीवर पाणी सोडावे लागले होते मात्र यंदाच्या पावसामुळे दुष्काळावर मात होवून मुबलक पाऊस झाला असून रावेर तालुक्याच्या जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या भोकर व सुकी नदी दुथडी वाहत आहेत.