धरणे फुल्ल!

0

पुणेसह अनेक शहरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

पुणे : दोन दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अनेक धरणे काठोकाठ भरली आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पुण्यात सतर्कतेचा इशारा
पुण्याच्या खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यांनतर 11 हजार क्युसेसचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलिस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत 11 हजार क्युसेस पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे.

उजनी, राधानगरी, भंडारदरातून विसर्ग
सोलापुरचे उजनी धरणही पूर्ण भरले आहे. कोल्हापुरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचे वारणा ही धरणेही पूर्ण भरली आहेत. अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून 5,673 क्युसेस, निळवंडे धरणातून 18,975 क्युसेस तर ओझर प्रकल्पातून 8,035 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण 18,800 क्युसेस पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे.

तानसा, भातसा, मोडकसागर भरले
मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये सध्या 128.93 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात 144.59 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची एकूण क्षमता 145.08 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. भातसा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण 942.10 दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या 98.69 टक्के म्हणजेच 929.77 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.

मुंबईत जीनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसाने मुंबईत येणार्‍या ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील लाखो नागरिकांची तारांबळ उडाली होती. येथे धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले आहे. या धरणाची क्षमता 233.07 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. दमदार पावसाने मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरचीही चिंता मिटली आहे. येथील धामणी धरणदेखील 100 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता 276.35 दशलक्ष घनमीटर आहे.