धरण असूनही शेती सिंचनाविना

0

नवापुर। नवापुर तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या अडचणीबाबत निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी कल्लशेट्टी यांना दिलीप नाईक, माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत,आदिवासी सहकारी कारखाना चेअरमन शिरीष नाईक यांनी दिले आहे. त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की शासनाने अब्जावधी रुपये खर्च करुन नवापुर तालुक्यात रंगावली,हळदाणी,गडदाणी,नागन, नेसु, कोरडी, वीगदी, खेकडा, बोरपाडा या ठिकाणी मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांची निर्मिती केलेली आहे. विकासकामांमध्ये अडचणी न आणता अति अल्प मोबदल्यामध्ये प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांनी त्यांच्या सोन्यासारख्या शेतजमीनी प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. दुर्देवाने या सर्व धरणांचा सिंचनासाठी वर्षानुवर्षे उपयोग झालेला नाही ही वस्तुस्थिती असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक धरणाचे आधी बांधकाम आणि नंतर पुनर्वसन अशा पध्दतीने कामकाज झालेले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

बुडीत क्षेत्राबाहेर नकाशावर दाखविलेली घरे, झोपड्या यामुळे बाधीत झालेल्या आहेत. पुनर्वसनाच्या गावांमध्ये साध्या भौतिक सुविधा नाहीत. सदर गावे हस्तांतरीत न झाल्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

धरणग्रस्तांच्या जमिनींचे अयोग्य मोजमाप
नव्याने प्रस्तावीत व अर्धवट काम सुरु असलेल्या बर्डीपाडा आणि खोचापाडा या धरणांच्या खाली बाधीत होणार्‍या शेतकर्‍यांच्या जमीनी आणि घरांचेही योग्य मोजमाप झालेले नाही. साध्या नोटीसाही पाठविलेल्या नाहीत ही खेदाजी बाब आहे चिड आणणारी बाब असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. प्रस्तावित सिंचन क्षेत्र (बारमाही,आठमाही) आणि प्रत्यक्षात ओलीताखाली येणारे क्षत्रयामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रकल्पांसाठी शेतजमीनी मातीमोल भावाने देणारे शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत. प्रकल्प बाधीत सुयोग्य पुनर्वसनाची वर्षानुवर्षे वाट पाहात आहेत. ज्यांना पाणी मिळण्याची अपेक्षा होती हे अद्यापही आकाशाकडेच डोळे लावुन बसलेले आहेत असे चित्र आहे. काही धरणे पुर्ण आहेत परंतु पाटचार्‍यांचे कामच झालेले नाही. त्यामुळे धरणात पाणी आहे परंतु पाटचारीविना पाणी अशी परिस्थिती आहे.

कालवे, पिचींग सारखी कामे अर्धवट : काही पाटचार्‍यांचे काम अर्धवट झालेले आहे. परंतु पाटचाार्‍यांसाठी भुसंपादनाची साधी नोटीस शेतकर्‍यांना बजावलेली नाही. मोबदला तर नाहीच नाही. काही धरणे पुर्ण झाल्याचे जाहीर केलेले आहे. परंतु डावे,उजवे,कालवे,पिचिंग,यासारखी कामे अपुर्ण आहेत. धरणांचे चुकीचे सर्वक्षण केल्यामुळे धरणामधील पुर पातळी महत्तम पातळीवर गेल्यानंतर संपादित न केलेल्या जमीनीमध्ये पाणी शिरल्याची उदाहरणे आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा
अधिकाधिक सिंचन क्षेत्र वाढावे याबाबत गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी सर्व प्रकल्पबाधीत गांवकरी आणि शेतकरी तसेच तसेच तालुक्यातील आदिवासी जनतेच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर दिलीप नाईक, माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत,आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक , न.पा गटनेते गिरीष गावीत,पं.स उपसभापती दिलीप गावीत, भाजप चे अनिल वसावे,अरुण गावीत,आर.सी.गावीत,एम.एन.वसावे, भालचंद्र गावीत,गुलाबसिंग वळवी,अर्जुन वळवी,संजय गावीत,ईश्वर गावीत,विनय गावीत,लताबाई गावीत,दिलीप गावीत,रामकु गावीत,राहुल गावीत,काळुराम गावीत,अजय कोकणी,गिरीष वळवी,यशवंत गावीत,अनिल गावीत यांचा सह्या आहेत.