शिंदखेडा (प्रा. अजय बोरडे) । उन्हाळा जसजसा वाढत चालला आहे तसतसे पाण्याची समस्या सगळीकडेच गंभीर झाली आहे. मात्र पाण्याचे स्त्रोत मुबलक असूनही पाण्याची समस्या सुटत नसेल तर मात्र नेमके ’पाणी’ कुठे मुरतेय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी म्हणून असणारी ओळख पुसली जावी तसेच तालुक्यातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी व शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली.
या प्रकल्पामध्ये पाणी साठवण क्षमतेपर्यंत आहे. प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा असून देखील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे तर पाण्याअभावी शेतकर्यांना शेती करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे ’धरण उशाशी-कोरड घशाशी’ अशी स्थिती झाली आहे. मात्र या समस्येकडे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची मात्र अनास्था असल्याचे चित्र आहे.
दुष्काळी तालुका म्हणून नोंद
शिंदखेडा तालुक्यात पावसाचे अनियमित प्रमाण असल्याने कधी ओला तर कधी कोरडया दुष्काळाशी तालुक्यातील जनतेला सामना करावा लागतो. याचमुळे शासन दरबारी देखील दुष्काळी तालुका म्हणून नोंद आहे. या तालुक्यात पांझरा, तापी, बुराई नद्या आहेत. या नद्यांवर सिंचन प्रकल्प झाले आहेत. पांझरा नदीवर सोनवद तापी नदीवर सुळवाडे तर बुराई नदीवर वाडी- शेवाडी मध्यम सिंचन प्रकल्प आहेत.
या प्रकल्पातील पाणी शेतकर्यांना शेतीसाठी तर नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे असा उद्देश होता. शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगांव नजिक पांझरा नदीवर सोनवद धरणात पाणीसाठा आहे. परंतु शासनाच्या कठिण नियमामुळे पाणी असून देखील ते उपलब्ध होऊ शकत नाही. प्रकल्पात असलेल्या पाण्याकडे पाहून पाणी टंचाईशी सामना करावा लागतो.
शासन व लोकप्रतिनिधी उदासीन
तालुक्यात तापी नदीवर सुळवाडे गावाजवळ सुळवाडे मध्यम सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण पाणी साठा क्षमता 65.06 द.ल.घ.मी आहे. त्यापैकी 64.942 दलघमी सिंचन पाणीसाठा असून 0.0118 दलघमी मृत पाणीसाठा आहे. यामध्ये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून 25.09 दलघमी पाणी पिण्यासाठी तर 4.38 दलघमी पाणी औद्योगिक वापरासाठी उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे सुळवाडे, सुकवद, तावखेत, दमाने, कमखेडे, हुबर्डे, वडळा, वडोदे, मकासर, मुडावद, वर्षी, गव्हाणे, शिधले, वाऊडे, गोराणे, वाघोदे, होळ, दसवेल या गावांना पाणी उपलब्ध होणार होते.
मात्र प्रकल्पात पाणीसाठा असून देखील यातील बहुसंख्य गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याऐवजी तात्पुरत्या योजना राबविण्यात येऊन शासनाचा मोठा निधी दरवर्षी खर्च केला जातो. कायमस्वरूपी योजना राबविण्याबाबत देखील शासन व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचेच चित्र आहे. प्रकल्पांमध्ये पाणी असून देखील अबालवृद्ध, स्त्री पुरुषांची दिवसाची सुरुवात पाण्याच्या भटकंतीने होते.
प्रकल्पात पाणी असून समस्या
प्रकल्पापासून केवळ आठ किमी अंतरावर शिंदखेडा शहर आहे. मात्र शहरात देखील दहा- बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या प्रकल्पामधून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. मात्र सद्य स्थितीत प्रकल्पात असलेला प्रचंड पाणीसाठा पाहून फक्त आनंदित होण्यापलिकडे तालुक्यातील शेतकर्यांकडे कोणताही पर्याय नाही. बुराई नदीवर असलेला वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प हा या तालुक्याची दुष्काळी स्थिती बदलण्यात महत्वाचा प्रकल्प आहे.
ह्या प्रकल्पामुळे तालुक्यातील कोरडवाहू शेती बागायती होईल असेच चित्र राजकारण्यांनी निर्माण केले होते. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील वाडी- शेवाडी येथील शेतकर्यांनी आपल्या जमिनी शासनास दिल्या. मात्र सद्य: स्थितीत या गावातील नागरिकांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या प्रकल्पातील 33.81 दलघमी पाणीसाठी वापरासाठी आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांना शेतीसाठी तर सोडाच पिण्यासाठी देखील उपलब्ध होत नाही. या प्रकल्पांशिवाय तालुक्यातील नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र या बंधार्यांची देखील दुरावस्था झाल्याने पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आपल्या हक्काचे पाणी मिळत नसल्याची भावना उत्पन्न होत आहे.
पाणीटंचाईचे निवारण करावे
बंधार्यातील पाणी पावसाळा संपल्यानंतर हिवाळा या कालावधीसाठी उपयोगात येते. पुन्हा उन्हाळा आला की पाण्यासाठी भटकंती सुरु होते. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी पावसाळ्यात ते सोडून द्यावे लागले तेच उन्हाळ्यात शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाही तर धरण उशाला, कोरड घशाल अशीच परिस्थिती शेतकर्यांची होईल. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. आ. जयकुमार रावल हे राज्याच्या मंत्रीमंडळात खान्देशासह तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. ना. रावळ यांनी प्रकल्पातील पाणी शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यासाठी व पाणी टंचाई निवारणासाठी उपलब्ध करून द्यावे अशीच अपेक्षा शिंदखेडा तालुक्यातील नागरिकांची व शेतकर्यांची आहे.