धरण क्षेत्रात विविध जातींच्या पक्ष्यांचे आगमन : पर्यटकांची गर्दी

0

इंदापूर । उजनी धरण पाणलोट क्षेत्रात विविध जातींचे असंख्य पक्षी पहावयास मिळत असल्याने उजनीतील पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. येथे पक्षी पाहण्यासाठी आलेले पर्यटक धोकादायक नौकाविहार करत आहेत. याच धोकादायक पर्यटनामुळे 30 एप्रिल 2017 रोजी अगोती (ता.इंदापूर) येथे चार डॉक्टरांना जीव गमवावा लागला होता. तरीही अद्याप उजनी धरण पाणलोट क्षेत्रात धोकादायक नौकाविहार सुरूच आहे. रविवारी (दि. 9) नागपूर शहरातील वेणा तलावात आठ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर उजनी पाणलोट क्षेत्रातील नौकाविहाराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी येथेही असेच जीवघेणे पर्यटन सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

होडीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात डिकसळ, कुंभरगाव, तक्रारवाडी, पळसदेव, अगोती या भागात मोठ्या प्रमाणावर परदेशी पक्षी येत असतात. विशेषतः फ्लेमिंगो हा पक्षी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो. पर्यटकांना पक्षी दाखविण्यासाठी स्थानिक मासेमारी करणारे तरुण लाकडी होडीतून घेऊन जातात. एका होडीत क्षमतेपेक्षा जास्त तसेच सुरक्षा जॅकेट न घालता धोकादायक पर्यटन करतात. यामुळे या होडीतील प्रवास हा जीवघेणा ठरत आहे.

पर्यटकांचा जीवमुठीत धरून तपास
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने इंदापूर तालुक्यातील कुंभरगावला पर्यटकांसाठी निवास न्याहारी योजनेचा अधिकृत दर्जा दिला आहे. यामुळे या भागात सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटक येत असतात. येथे पक्षी बघण्यासाठीचा बोटीचा प्रवास किमान दोन ते तीन तासांचा असतो. यावेळी पाण्यातच 5 ते 6 किलोमीटर प्रवास करावा लागतो, त्यामुळे नाविकांनी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेणे बंधनकारक आहे. एका बोटीची मर्यादा पाच ते सहा पर्यटक एवढी असतानाही अनेकदा त्यात 10 ते 15 जणांना बसवले जाते. पर्यटकांना जीवमुठीत धरून प्रवास करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. महाराष्ट्र पर्यटन मंडळाने या पर्यटनासाठी अधिकृत दर्जा देताना सुरक्षेच्या योजना तपासल्या नाहीत का, अशी शंका निर्माण होत आहे.

बंदी असतानाही पर्यटन
ज्या धरणावर विजनिर्मीती प्रकल्प आहे. त्या धरण क्षेत्रात पाण्यामध्ये पर्यटन करण्यास बंदी आहे. मात्र, उजनी धरणावरदेखील विजनिर्मिती प्रकल्प असल्याने धरण पाणलोट क्षेत्रात पर्यटन करण्यास बंदी असून देखील हा व्यवसाय चालतो तरी कसा, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. याकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व उजनी धरण व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.