पुणे (प्रभव खांडेकर) – शहरासह जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्या धरण साखळीच्या परिसरातीलच गावांना सध्या टँकरची प्रतीक्षा आहे. कडक उन्हामुळे नागरिकांची दैना उडत असून, त्यातच पाणीटंचाईमुळे घेरा सिंहगड परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, खडकवासला धरणसाखलीत आता अवघा 7.70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, या पाण्याच्या वापरावर जिल्हाधिकार्यांनी निर्बंध घातले आहेत.
खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर अशी चार धरणे खडकवासला धरणसाखळीत आहेत. ही सर्व धरणे सिंहगडाच्या परिसरातच आहेत. या घेरासिंहगड परिसरात एप्रिलच्या मध्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले होते. आता मेच्या प्रारंभी पाण्यासाठी नागरिकांची वणवण चालू झाली आहे.
या परिसरातील मोगरवाडी, खामगाव मावळ, आर्वी, चांदेवाडी कल्याण आदी गावे व त्यांच्या वाड्या-वस्त्यांना पाण्याचे रेशनिंग करावे लागत आहे. या गावांनी तहसीलदारांकडे टँकरची मागणी केली असून, तहसीलदारांनी ही मागणीही मान्य केल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप या गावांना टँकर सुरू झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांची वणवण सुरूच आहे. तहसीलदारांनी तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
वळवाची प्रतीक्षा
यंदा मार्चच्या अखेरीसच कडक उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांना कडक उन्हाळ्यास सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी मेपर्यंत वळवाचे एक- दोन पाऊस होऊन गेलेले असतात. यंदा पुणे परिसरात अद्याप असा एकही पाऊस न झाल्याने घेरासिंहगड परिसर अधिकच तापला आहे. गेले दोन दिवस काही वेळा ढगाळ हवामान होते; परंतु पाऊसच न झाल्याने ग्रामस्थांची निराशा झाली.
काटकसरीने वापरा पाणी
धरण साखळीत सध्या सुमारे 7.70 टीएमसी पाणी शिल्लक असल्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी इमारतींचे बांधकाम, जलतरण तलाव आणि गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर निर्बंध लावले आहेत. तसेच, पुणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नियोजनासाठी होणार बैठक
शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून 11 मे रोजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यात शहराच्या पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला पालिकांचे आयुक्त आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शहराला रोज 1350 एमएलडी पाण्याची गरज आहे.
ग्रामीणला हवे अधिक पाणी
सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाळी आवर्तनाला सुरवात करण्यात आली असून, कालव्यानजीक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी 3.51 टीएमसी पाणीसाठा राखीव आहे. मात्र, यंदा उन्हाळा कडक असल्याने पाण्याचे बाषीभवन होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी 4.25 टीएमसीची गरज भासत आहे.