पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील चार तालुक्यांना पाणी पुरवणार्या खडकवासला धरण साखळी शेजारील गावे व वाड्या-वस्त्यांवर एप्रिलच्या प्रारंभीच पाण्याचे रेशनिंग करण्याची वेळ आली आहे. तसेच, जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यांतील सुमारे 50 गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. खडकवासला धरण साखळीत वरसगाव, पानशेत, टेमघर व खडकवासला अशी चार धरणे येतात. या धरणसाखळीची क्षमता 29 टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे ही सर्व धरणे भरली होती. मात्र, गळतीमुळे टेमघर धरण रिकामे करण्यात आले होते. सध्या टेमघरमध्ये शून्य टक्के साठा आहे, तर उर्वरित तीन धरणांतील साठा 11 टीएमसीवर आला आहे. खडकवासला धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. ते 25 मार्चला बंद करण्यात आले आहे. धरण साखळीच्या परिसरात मार्चच्या अखेरीपासूनच कडक उन्हाळा सुरू झाला असून, बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे उर्वरित पाणीसाठा पावसाळा सुरू होण्यापर्यंत वापरण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.
अद्याप प्रशासकीय नियोजन शून्य
सिंहगडाच्या परिसरातच असलेल्या या धरणांचा या परिसरातील गावांना मात्र म्हणावा तसा उपयोग होत नाही. नरवीर तानाजी मालुसरे जो कडा चढून वर गेले, त्या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोगरवाडी आणि या कड्याजवळ असलेल्या खामगाव मावळसारख्या गावांना आणि या गावांच्या परिसरातील सुमारे वीसएक वाड्या- वस्त्यांना आतापासूनच पाणीटंचाईचे सावट जाणवू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एप्रिलच्या प्रारंभीच पाण्याचे रेशनिंग सुरू केले आहे. या गावांच्या परिसरातील विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे आहे ते पाणी पुरवून वापरण्यावर भर देण्याशिवाय ग्रामस्थांपुढे उपाय नाही. या गावांसाठी धरणांतून पाणीयोजना राबवण्याचा विचारही प्रशासनाने अद्याप केलेला नाही, याबाबतही ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पुणे शहराला लागून असलेल्या लोहगाव ग्रामपंचायतीच्या परिसरातही पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. दहा दिवसांतून एकदा ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
तातडीने टँकर सुरू करण्याची गरज
दरम्यान, बारामती तालुक्यातील मरोगवा, सुपे, मुर्टी या परिसरातील 22 गावे, इंदापूर तालुक्यातील निमसाखर व त्या परिसरातील 22 गावे व पुरंदर तालुक्यातील सुमारे दहा गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नाझरे जलाशयातील साठा आता एकदम रोडावला असून, कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने आताच या पाणीसमस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. टँकरची मागणी केल्यानंतर प्रत्यक्ष टँकर सुरू होण्यास वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर देण्यात कालापव्यय करू नये, अशीही नागरिकांची मागणी आहे.