पुणे । मानवी जीवन सुखी करण्यासाठीच धर्म अस्तित्वात आले. शिवाय त्या-त्या काळातील भयंकर सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने उद्धारासाठी संतांनी मानवाला सुखी करण्याचा उपदेश केला. संतश्री ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचून मनुष्याला भक्ती करण्यास शिकविली. ज्ञानेश्वरी ही मानवाच्या मनातील अज्ञान घालवून जीवन प्रकाशमय करणारी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव आणि कायदेविषयक सल्लागार मदन गोसावी यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या वतीने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 22व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ‘ज्ञानदेवाचा भागवत आणि वर्तमान स्थिती आणि प्राप्त परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. डॉ. एस. एन. पठाण, वरिष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व प्रा.मिलिंद पात्रे आदी उपस्थित होते.
आंतरिक व बाह्य विकास हा त्याच्या विचारांवर
डॉ. काळे म्हणाले, मानवचा आंतरिक व बाह्य विकास हा त्याच्या विचारांवर आधारित असतो. विज्ञानाने प्रयोगाद्वारा हे सिद्ध केले आहे, मानवी विचारांच्या आधारे तो सृष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. प्रेम आणि शांती या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्या शरीरातील पेशींना युवावस्थेत आणण्याचे कार्य करते.
सर्वांवर प्रेम करा हीच माऊलींची शिकवण
गोसावी म्हणाले, ज्ञानेश्वरांच्या नुसत्या एका ओवीची अनुभूती घेतली तर मानवी जीवनाबरोबरच समाजजीवनही सुखी होईल. व्यवहाराबरोबच कर्मयोग कसा आचरावा, याचे ज्ञान त्यांनी दिले. या सृष्टीवरील 300 धर्मात एकच शिकवण आहे, ती म्हणजे सर्वांवर प्रेम करा. हीच शिकवण माऊलींनी देऊन सामाजिक जीवन सुखी करण्याचे कार्य केले आहे.
धर्मांचा यथाशक्ती अभ्यास करणे
डॉ. तापकीर म्हणाले, मानवाला आनंदी राहण्याचे सर्वात मोठे सूत्र म्हणजे सर्व धर्मांचा यथाशक्ती अभ्यास करणे. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव निर्माण होणे गरजेचे आहे. मी कोण आहे, याचा शोध घेताना फक्त मन आणि बुद्धीचाच शोध लागतो. कारण पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर शेवटी मातीतच मिळणार आहे. त्यामुळेच बुद्धीपर्यंत जाऊन केलेले अध्यात्म म्हणजे आध्यात्मिक बुद्धयांक असे आपण म्हणू शकतो. प्रा. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.
सर्व धर्मग्रंथ हे जीवन ग्रंथ
डॉ. कराड म्हणाले, भारत ही ऋषिमुनी, तपस्वी आणि संतांची भूमी आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, ही शिकवण आम्हाला संतानी दिली आहे. सर्व धर्मग्रंथ हे खर्या अर्थाने जीवन ग्रंथ आहेत. कसे जगावे व कसे जगू नये याचे सार त्यामध्ये आहे. प्रबोधन कार्यशाळेत स्वरप्रकाशित चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. सुनील काळे व विचारवंत डॉ. दत्तात्रय तापकीर यांची व्याख्याने झाली.