पाटणा । धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार घाबरले आहे. त्यामुळेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आदींसारख्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केला. बिहारमध्ये पराभूत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडे काही काम राहिलेले नाही. त्यामुळेच ते आमच्यावर आधारहीन आरोप करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. रविवारी त्यांनी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. आमच्या कुटुंबीयांवर आणि सहकार्यांवर टाकण्यात येत असलेले प्राप्तिकर विभागाचे छापे हे राजकीय हेतून प्रेरित आहेत. त्यांना माहीत आहे की, लालूप्रसाद यादव हे जातीयवादी शक्तींविरोधातील लढाई सोडणार नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू केला असल्याचे म्हटले.दिल्लीत लवकरच एका धर्मनिरपेक्ष महायुतीचे नेतृत्व पाहण्यास मिळेल. ते (भाजप) आम्हाला घाबरले आहेत. आता ते ममता बॅनर्जी आणि नवीन पटनाईकसारख्या नेत्यांविरोधात सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत, असा आरोप केला.
वाढदिवसानिमित्त आपल्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी शुभेच्छा दिल्या तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार भेटून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ममता बॅनर्जी, सी. पी. जोशी आणि गिरिराज सिंहसारख्या अनेक नेत्यांनी आपल्या ट्विटरवरून शुभेच्छा दिल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, शेतकरी आणि जवान हे देशाचे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. पण ते सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 2019 मधील लोकसभा निवडणुकांपूर्वीच कोसळेल, अशी भविष्यवाणी लालूप्रसाद यांनी केली होती.