धर्मनिरपेक्ष, समताधिष्ठित समाज हे बाबासाहेबांचे स्वप्न : राजकुमार बडोले

0

सणसवाडी । बर्‍याच कालखंडानंतर समाज्यात परिवर्तन दिसत असून जातीविरहित धर्मनिरपेक्ष, समताधिष्टीत अशा समाजाचे स्वप्न डॉ. बाबासाहेबांचे होते ते आता आकाराला येते आहे, असे मत समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर व नालंदा बुध्द विहारच्या वतीने पेरणे येथील रणस्तंभास 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भव्य रांगोळीचे प्रदर्शनाचे तसेच राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटन बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बडोले यांनी सुनिरा स्पोर्ट अकादमीचे व सुदाम पवार सभागृहाचेही उद्घाटन केले.

डॉ. आंबेडकरांचे विचार आचारणात आणा
बडोले म्हणाले, तरुणांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावे ही गरज काळाची गरज आहे. रांगोळी प्रदर्शनात भगवान गौतम बुद्ध, सांची प्रवेशद्वार, बुद्धगया, विजयस्तभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यप्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. रांगोळी 95 फूट बाय 35 फूट असून या रांगोळी भिवंडी येथील नामवंत रांगोळीकाराने साकारली आहे. यावेळी कार्यक्रमास आमदार जयदेव गायकवाड, प्रा. दामोदर मोरे, प्रा. खैरे, आय. एम. मोरे, साहित्य परिषदेचे शुक्राचार्य गायकवाड, शिरूर तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, प्रा. रतनलाल सोनग्रा, अजित अभंग, सणसवाडी सरपंच रमेश सातपुते, नितीन पवार, सुदंराव पवार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वंदना साठे यांनी वनस्पती शास्त्रात पीएचडी मिळाल्याबद्दल मंत्री बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे तर आभार विशाल खरात यांनी मानले.