धर्मांधावर हिंदू बांधवांनी आर्थिक बहिष्कार घालावा

0

नंदुरबार । समस्त हिंदु बांधवांनी धर्मांध लोकांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे धोरण अवलंबले तर, वर्ष-दोन वर्षात नक्कीच ते लोक आपल्यापुढे लोटांगण घालत भारत माता की जयचा नारा देतील, असा विश्‍वास हैद्राबाद (भाग्यनगर) येथील गोरक्षक तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी नंदुरबार येथील सभेत बोलतांना व्यक्त केला. नंदुरबार येथील ग्यारामील कंपाऊंड मैदानावर 30 एप्रिल रोजी झालेल्या हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभेला आ.ठाकूर हे संबोधीत करीत होते. आधी या सभेचा प्रारंभ शंखनादाने आणि वेदमंत्र पठणाने करण्यात आला. त्यानंतर सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर आ. राजासिंह ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्पहार अर्पण केला.

…तर भगिनींकडे पाहण्याची हिंमत होणार नाही
यावेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनिल घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे उपस्थित होते. आमदार राजासिंह ठाकूर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर बेहेरे यांनी पुष्पगुच्छ देऊन तर, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख जितेंद्र राजपूत यांनी सर्व सन्माननीय वक्त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेची मुहूर्तमेढ करण्यासाठी तलवार भेट दिली. सभेचे सूत्र संचालन श्रेयस पिसोळकर आणि तेजस्विनी तांबट यांनी केले. डॉ. नरेंद्र पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीचा कार्यपरिचय दिला. सभास्थळी हातात भगवे झेंडे घेऊन जय भवानी जय शिवाजी, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम, हर हर हर महादेव, राम राम जय श्रीराम, वंदे मातरम् या घोषणांचा जयघोष झाला. सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव म्हणाले की, हिंदुंनी शूर आणि संघटीत झाले पाहिजे. आपण संघटीत झालो तर, धर्मांतर बंदी आणि गोहत्या बंदी करण्याची वेळच येणार नाही. आपल्या भगिनींकडे वाईट नजरेने पहाण्याचे धाडस कोणी करणार नाही. रागेश्री देशपांडे यांनी सांगितले की, हिंदु पालकांनी धर्मशिक्षण घेऊन मुलांवर सुसंस्कार केल्यास कोणतीही मुलगी लवजीहादला बळी पडणार नाही. आजच्या मुलींना टिकली लावणे, बांगड्या घालणे, वेणी घालणे हे मागासलेपणा व गावंढळपणो लक्षण वाटते. मात्र मुलींनी पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुरकरण न करता स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सज्ज रहावे.