मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. दै. सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपावर टीका करत ‘धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नसल्याचा निर्वाळा त्यांनी केला आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नाही त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करायची दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही. माणसं माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे विचार व्यक्त केले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ मुलाखतीचा तिसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला. त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत. भारतीय जनता पक्षाने कडवट हिंदुत्ववादी पक्षाला दूर ढकलून नको ते पक्ष मांडीवर घेऊन बसला आहे, असे सांगत हे कसले हिंदुत्व, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही भाजपसोबत केवळ राजकारणातील अपरिहार्यता म्हणून नव्हतो, असेही ठाकरे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने आपली फसवणूक केल्याची भावना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. गेल्या वेळी युती नसतानाही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. आणि जेव्हा युती झाली तेव्हा हा आकडा घसरून तो ५६ वर आला याची मिमांसा करणे म्हणजे नुसते अंदाज आणि तर्क होऊ शकतात. मात्र युतीमध्येही भाजपचा आकडा घसरला याकडेही त्यांनी लक्ष वेधले.