धर्मादाय कार्यालयातील लाचखोर लिपिक अटकेत

0

धुळे। न्यायालयीन प्रकरणातील प्रती देण्यासाठी लाच मागणार्‍या धर्मदाय कार्यालयातील अधर्मी लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे धर्मदाय कार्यालयात एकच खळबळ उडाली. धुळे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयात एका 42 वर्षीय इसमाने न्यायालयीन कामकाजाच्या प्रती मागितल्या होत्या. नियमानुसार फी घेवून या प्रती उपलब्ध करून देणे हे तेथील लिपीक विजय बाळकृष्ण शिरसाठ याची जबाबदारी असतांना त्याने शासकीय फी ऐवजी लाचेची मागणी केली होती. या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार केल्याने उपअधीक्षक सुनिल गांगुर्डे यांच्या नेतृत्वात पो.नि. पवन देसले, कर्मचारी जितेंद्र परदेशी, किरण साळी, संदीप वेंदे, कैलास शिरसाठ आदींनी सापळा रचला असता लिपीक विजय शिरसाठ 1500 रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ सापडला.

लाचलुचपत विभागाने रचला होता सापळा
विजय शिरसाठ याचेकडे सार्वजनिक न्यास नोंदणीचे काम असून तो पैसे घेतल्याशिवाय कुठलाही कागद पुढे सरकवत नाही असे त्याच्याबद्दल कार्यालय परिसर आवारात बोलले जात होते. विशेष म्हणजे कपाळावर लांब टीळा लावून वावरणारा विजय शिरसाठ हा सरळमार्गी असावा असाच समज प्रथमदर्शनी होतो. मात्र कपाळावर टिळा असला तरी त्याचा डोळा मात्र लाचेवर असल्याचे आज सिंध्द झाले. दोनच दिवसांपूर्वी धुळे जिल्हा न्यायालयात एका लिपीकाला अवघे 50 रूपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादच्या वकीलाने ही तक्रार केल्याने न्यायालयातही कागदासाठी पैसाच मोजावा लागतो हे सिध्द झाले होते. तर आज ज्या कार्यालयाच्या नावात धर्मदाय शब्द आहे त्याच कार्यालयात लिपीक लाच घेण्याचे अधर्मी कृत्य करीत असल्याचे उघड झाले आहे.