पुणे ।राज्यात नव्याने सुरू होणार असलेल्या धर्मादाय रुग्णालयांच्या डायलिसिस केंद्रांतील रुग्णांना डायलिसिसची औषधे विनामूल्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. डायलिसिस उपचारांची गरज असलेल्या हजारो रुग्णांना या निर्णयामुळे मदत होणार आहे.
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नवीन केंद्र
राज्यात नव्याने सुरू होणार असलेल्या डायलिसिस सेंटरना औषध विक्रेते संघटनेकडून सहकार्य केले जावे, असे आवाहन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून औषध विक्रेते संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नवीन डायलिसिस केंद्रे धर्मादाय तत्त्वावर चालू करण्यात येणार असून या केंद्राच्या मदतीने 3000 रुग्णांवर दर महिन्याला डायलिसिस उपचार करण्याचे उद्दिष्ट धर्मादाय कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले आहे. एका रुग्णाचे डायलिसिस करण्यासाठी साधारण 500 ते 600 रुपयांची औषधे लागतात. सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामूल्य औषधे पुरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
स्थानिक देवस्थानांचे सहकार्य
पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे, बीड, लातूर, पालघर, बुलडाणा, वाशीम, धुळे या जिल्ह्यांमध्ये स्थानिक देवस्थानांचे सहकार्य घेऊन डायलिसिस केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ राज्यभर ही केंद्रे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बदलत्या जीवनशैलीच्या प्रभावातून मूत्रविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून डायलिसिसचे उपचार रुग्णांच्या आवाक्यात येण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरणार असल्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले.
दररोज 10 रुग्णांवर डायलिसिस
दरम्यान मोफत औषधांची सुविधा सध्या अस्तित्वात असलेल्या धर्मादाय रुग्णालयांमधील डायलिसिस केंद्रांनाही मिळावी अशी मागणी शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ. सुहास परचुरे यांनी केली आहे. राज्यात 200 ते 250 धर्मादाय रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा आहे. प्रत्येक रुग्णालयात रोज किमान 10 रुग्णांवर डायलिसिस उपचार केले जातात. त्यासाठी येणारा औषधांचा खर्च मोठा असून औषधे विनामूल्य मिळाली तर धर्मादाय रुग्णालयांचा आर्थिक ताण आवाक्यात येणार आहे. म्हणून धर्मादाय रुग्णालयांचाही या योजनेसाठी विचार करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे डॉ. परचुरे यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालयांच्या या मागणीवर सकारात्मक विचार करणार असल्याचेही शिवकुमार डिगे यांनी सांगितले.