धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी उत्पन्न मर्यादा वाढविणार

0

पुणे । राज्यातील धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील रुग्णालयांत गरीब रुग्णांवर उपचार करण्याची सवलत मिळावी यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी माहिती राज्याचे धर्मादाय आयुक्त एस. जी. डिगे यांनी दिली. धर्मादाय रुग्णालय गरीब रुग्णांच्या दारी या धर्मादाय रुग्णालयांच्या 3 डिसेंबर रोजी झालेल्या विशेष उपक्रमात सहभागी झालेल्या रुग्णालयांचा राज्याचे धर्मादाय डिगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात गरीब रुग्णांच्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालयांकडे 36 कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. प्रत्यक्षात 38 कोटी रुपये खर्च झाला आहे. म्हणजेच पुण्यातील रुग्णांनी या योजनेसाठी अधिकची रक्कम खर्च केली ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत धर्मादाय सहआयुक्त शिवाजी कचरे यांनी व्यक्त केली. राज्यात या उपक्रमात एकाच दिवशी 56 हजार तर पुणे जिल्ह्यात 17 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. पिंपरीच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने सर्वाधिक 3214 रुग्णांची तपासणी करून प्रथम क्रमांक मिळविला. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील. विश्‍वस्त डॉ. यशराज पाटील यांनी रुग्णालयाच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. त्यापाठोपाठ एम्स हॉस्पिटल 1790, भारती हॉस्पिटल 1399, रुबी हॉल 789 आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल 672 या रुग्णालयांनी अनुक्रमे दोन ते पाच क्रमांक पटकाविले. डॉ. पी. डी. पाटील व डॉ. के. एच. संचेती यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजात अनाप यांनी प्रास्ताविक केले. सहायक धर्मादाय आयुक्त कांचनगंगा जाधव यांनी आभार मानले.

एकही गरीब रुग्ण उपचाराशिवाय राहू नये
या कार्यक्रमाला पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त एस. बी. कचरे, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, धर्मादाय उपआयुक्त एस. एम. गोडसे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. के. एच. संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. डिगे म्हणाले, रुग्णांवर उपचार करण्यासाठीचा निधी संपला किंवा चुकीचे लोक उपचार घेतात अशी रुग्णालयांची नेहमी तक्रार असते. गरीबीचा देखावा करणार्‍यांची चौकशी करण्याचा रुग्णालयांना हक्क आहे, पण ते करीत असताना एकही गरीब रुग्ण उपचाराशिवाय राहू नये, याची काळजी घ्यावी. गरीब व निर्धन रुग्णांसाठी राज्यात एक हजार बेड आहेत. तरीही सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होते, याचा अर्थ गरीब धर्मादाय रुग्णालयात यायला घाबरतो का खर्‍या गरीबांना उपचार मिळतात का याचा विचार व्हायला पाहिजे. गरीब व वंचितांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत.