धर्मादाय रूग्णालयात गरिबांच्या उपचारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

0

मुंबई । राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या गरीब-गरजूंच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आता जास्त गरिबांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार शक्य होणार आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या गरीब आणि गरजूंना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या गरिबांची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो गरिबांना याचा फायदा होणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये होते, त्यांच्या उत्पन्नाची सीमा 85 हजार करण्यात आली आहे. एक लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांची सीमा 1 लाख 60 हजार करण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयात गरिबांना स्वस्तात उपचार मिळावेत, याकरता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ज्या गरीब रुग्णांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार आहे. त्यांच्यावर धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार होत होते. ही मर्यादा वाढवून 85 हजार करण्यात आली आहे, तर ज्याचे वार्षिक सर्वसाधारण उत्पन्न 1 लाख रुपये आहे. ही मर्यादा 1 लाख 60 हजार पर्यंत वाढवली. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार मिळणे सोपे झाले आहे. धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयाच्या क्षमतेच्या 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. पण, काही रुग्णालयांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात येत होती. मात्र, आता राज्य सरकारनं अधिकाधिक रुग्णांना उपचाराचा लाभ घेता यावा याकरिता हा निर्णय घेतला आहे.

गरिबांना उपचार
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून गरीब रुग्णांच्या उत्पन्नाची सीमा वाढवण्यात यावी अशा सूचना मिळत होत्या. गेल्या काही वर्षात महागाईदेखील वाढली. त्यामुळे सर्वांशी चर्चाकरून हा निर्णय घेण्यात आला. अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे, 85 हजार वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना मोफत, तर 1 लाख 60 हजार उत्पन्न असणार्‍यांना परवडणार्‍या दरात उपचार मिळणार आहेत.