नंदुरबार । रेवंदडा (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यात राबविलेल्या जलसंधारणाच्या पॅटर्नने भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. बंद कुपनलिकांना पुनर्जिवीत करण्याचे काम यातून झाले आहेत. प्रतिष्ठानने राबविलेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षी या काळात दहा मिनिटेही न चालणारे बोअरवेल निवडण्यात आलेले होते. ते सध्या पाऊण तास चालत आहेत. या उपक्रमामुळे भर उन्हाळ्यातही सरासरी दोन ते तीन तास पाण्याची उपलब्धी होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बंद कुपनलिका झाल्या सुरू
सामाजिक उपक्रमांवर भर असलेल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जलपुनर्भरण प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यात बंद कुपनलिका व विहीर पुनर्भरण करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्याकडून हे काम पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. त्यांना फक्त साहित्य आणून द्यावे लागते. नंदुरबार शहरात प्रतिष्ठानने 140 ठिकाणी पूर्णपणे बंद तसेच कमी पाणी असलेल्या कुपनलिका निवडून तेथे असे काम झाले आहे.
कसे आहे कुपनलिका पुनर्भरण?
पावसाळ्यात छतावरील वाहून जाणारे पाणी पाईपच्या मदतीने घराजवळच्या कुपनलिकेला जोडून सोडले जाते. यासाठी कोळसा, वाळू, खडी, बारीक वाळूचा उपयोग करुन एक फिल्टर देखील तयार केले जाते. पावसाळ्यात किमान 15 ते 20 वेळा या पद्धतीने कुपनलिकेतून पाणी थेट शेकडो फुट जमीनीखाली सोडले जात असल्याने या भागातील पाणी पातळी वाढण्यास मोठी मदत होते. याच प्रकारे विहीर पुनर्भरण देखील केले जाते. कमी खर्चात आणि सहज सोपा असलेला हा प्रकल्प अतिशय लाभदायक असून एक प्रकारे पथदर्शी आहे.
‘केवळ 100 फुट खोल कुपनलिका असल्याने फेब्रुवारीपासून पाणी उपसा बंद व्हायचा, मात्र गेल्या वर्षी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मदतीने कुपनलिका पुनर्भरण केल्यानंतर अर्धातासहून अधिक पाणी मिळत आहे.’
– लायन्स क्लब व डॉक्टर्स असोसिएशन
दरवर्षी मार्चपासूनच केवळ हंडाभर पाणी कुपनलिकेतून येत असे, मात्र जलपुनर्भरणानंतर यंदा मे महिन्यातही 3 तासांपेक्षा अधिक पाणी उपसा येत होत आहे.
-डॉ.सुनिल पाटील
रक्षक हॉस्पीटल नंदुरबार
‘गेल्या वर्षी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून जलपुनर्भरणाचे काम करुन घेतल्यानंतर यंदा मे व जून महिन्यातही किमान 4 ते 5 तास कुपनलिकेतून पाणी मिळत आहे.’
-श्री.भरत निकुंभे
ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती, नंदुरबार