मुंबई :- धर्माबाद शहर व तालुक्यातील नागरी सुविधांची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
प्रारंभी कदम यांनी नियोजन विभाग, जिल्हा परिषद, नाविन्यपूर्ण योजनेचा निधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीचा आढावा घेऊन नागरी सुविधांच्या प्रस्तावांवर चर्चा केली. उपलब्ध निधीमधून ग्रामीण भागातील 230 किमीची रस्त्यांची कामे करणे, तलावांची दुरुस्ती व स्वच्छता करणे, पथदिवे लावणे, स्मशानभूमी बांधणे, सांस्कृतिक भवन उभारणे, ग्रामीण भागातील विविध आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपकरणांची खरेदी करणे, शाळांची दुरुस्ती करणे, धर्माबाद एस.टी. आगारासाठी जागा देणे, आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स खरेदी करणे अशा अनेक सोयी सुविधांच्या प्रस्तावावर निधी खर्च करण्याचे निर्देश श्री. कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला महसूल विभागाचे अधिकारी तसेच परिवहन, विद्युत मंडळ, शिक्षण विभाग, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण विभाग, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.