मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी; रावतेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई : धर्मा पाटील प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत उमटले. शिवसेनचे मंत्री दिवाकर रावते यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करत भाजपची पुरती कोंडी केली. मी कालपासून ऐकतोय की हे प्रकरण आधीच्या सरकारचे पाप आहे. पण फडणवीस साहेब, माझा तुम्हाला सवाल असा आहे की आधीच्यांनी शेण खाल्ले म्हणून त्यांना बाजूला सारून लोकांनी आपल्याला युतीला सत्तेवर बसवले, पण गेल्या 3 वर्षांत आपण काय केले? रावते यांच्या या खड्या सवालामुळे बैठक एक क्षण स्तब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपेक्षेप्रमाणे मंत्रीमंडळ बैठकीत धर्मा पाटील प्रकरणावरून खडाजंगी झाली. या बैठकीत मी हा विषय उपस्थित केला. हे प्रकरण गंभीर असून त्यामुळे युती सरकारची बदनामी झाली आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि या प्रकरणी स्वतः मुंख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे, अशी मी मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली, असे रावते म्हणाले. याच मुद्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून सामनातून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातूनही सरकारवर कोरडे ओढले आहेत. धर्मा पाटील यांच्या चितेची आग सरकारच्या खुर्च्या जाळेल अशी कठोर टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. यावरुन सेनेला भाजपने जोरदार प्रत्यूत्तर दिले आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्या खुर्च्या अग्नीरोधक नाहीत, त्यामुळे या आगीत तुमच्या खुर्च्याही खाक होतील असा पलटवार केला आहे.