पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी अहवाल द्या, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश!
मुंबई : वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने एका महिन्याच्या आत पाटील यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व्याजासह दिला जाईल असे लेखी आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिल्यानंतर सोमवारी पाटील कुटुंबीयांनी मृतदेह हाती घेतला. मात्र या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले असून फडणवीस सरकार यामुळे हादरले आहे. याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील उमटले. सरकारवर हे प्रकरण शेकणार असे दिसत असताना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आणि पुढच्या मंत्रीमंडळ बैठकीत चौकशी अहवाल देण्याच्या सूचना केल्या.
सरकारवर मोठा ठपका
सरकारकडून आपल्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही आणि तो मिळावा म्हणून धर्मा पाटील हे गेले अनेक वर्षे मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होते. अखेर न्याय मिळत नसल्यामुळॆ त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तब्येत नाजूक असलेल्या पाटील यांचे रविवारी निधन झाले. यानंतर विरोधी पक्षांसह शिवसेनेने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आधीच शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक त्रुटींमुळे वादग्रत ठरलेल्या भाजप सरकारवर पाटील यांच्या मृत्यूमुळॆ मोठा ठपका बसला आहे. या घटनेमुळे सोशल मिडीयावर आणि लोकांमध्ये सरकारविरोधी संतापाची लाट उमटली आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत
सरकारी अधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ केली. शेजारच्या जमीन मालकांना बाजारभावाने मोबदला, मात्र तोच भाव पाटील यांना देण्यास अधिकाऱ्यांनी हात आखडते घेतले होते, असे वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी कुठलाही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहिले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.