अधिक महिन्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह
पिंपरी : धर्म, अर्थ, काळ, मोक्ष हे चार पुरुषार्थ प्रत्येकाने प्राप्त केले पाहिजेत. त्यासाठी संतांची शिकवण आणि महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे. आपले जीवन परोपकारी असावे. त्यासाठी आपण कतृत्ववान असले पाहिजे. आपली क्षमता आपण ओळखली पाहिजे आणि त्यात वाढ केली पाहिजे, असे मत शिर्डीकर ह.भ.प. अमोलमहाराज बडाक यांनी व्यक्त केले. अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी चौथ्या दिवशी किर्तन सेवा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक प्रकाश मळेकर यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, स्वीकृत सदस्य देविदास पाटील, देवाआप्पा नखाते, दिनकर राऊत, विलास नढे, सुदाम नखाते, बाजीराव काळे, दिलीप काळे, अनिल कदम, शिवाजी काळे, बजरंग नढे, प्रमोद नढे आदी उपस्थित होते.
आई-वडिलांचे उपकार विसरु नका
अमोल महाराज पुढे म्हणाले की, जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. आपल्या कतृत्वाने जग आणि शरीर जिंकता आले पाहिजे. जो कोणाच्या कामाला येतो त्याला माणूस संबोधले पाहिजे, असे कर्तृत्व केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपली क्षमता निर्माण करून त्यात वाढ केली पाहिजे. आपण परोपकारी झाले पाहिजे. त्यासाठी महापुरुषांचे आदर्श प्रत्येकाने घेतले पाहिजेत. जुन्या कवितांना अर्थ होता. त्यामुळे मुलांवर संकार होत. आपल्या पूर्वजांकडे चांगले विचार होते. आई-वडिलांचे उपकार विसरु नका.