पुणे । महाराष्ट्रामध्ये भगवान गणेशाची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. लोकमान्य टिळकांनी हिंदूंच्या अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी गणेशपूजेला प्रोत्साहन दिले. देशातील इतर प्रांतांमध्ये देखील आता गणेशपूजा मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सण शास्त्रीय अनुष्ठानानुसार साजरे होत नाहीत. दिपावलीमध्ये वाढणार्या प्रदूषणामुळे वातावरण मलिन होत आहे. त्यामुळे शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करीत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्याकरीता सज्जनांची संघटनशक्ती होणे आवश्यक आहे. ईश्वर, धर्म आणि संघटनशक्ती हेच अस्तित्वरक्षणाचे योग्य मार्ग आहेत, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे प.पू. श्री मज्जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशिर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त उपस्थित होते. मंदिरामध्ये शंकराचार्यांच्या हस्ते श्रीं ना महाभिषेक, प्रवचनासह आरतीदेखील करण्यात आली.