धवन, राहुलमुळे भारताकडे 49 धावांची आघाडी

0

कोलकाता । पावसाच्या व्यत्ययामुळे चर्चेत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात शिखर धवन (94) आणि लोकेश राहुलच्या ( नाबाद 73) अर्धशतकांनी भारताला संकटातून बाहेर काढत 49 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. इडन गार्डनमधील चांगल्या वातावरणाचा फायदा उचलत धवन आणि लोकेशने पहिल्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील 122 धावांची पिछाडी मागे टाकत चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघावर आघाडी मिळवली होती. चौथ्या दिवसअखेर भारताने दुसर्‍या डावात एक विकेट गमावून 171 धावा केल्या. राहुलसह चतेश्‍वर पुजारा दोन धावांवर खेळत होता. अपुर्‍या प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ मध्येच थांबवण्यात आला. धवनचे शतक पाच धावांनी हुकले. धवनने 116 चेंडूंचा सामना करतान 11 चौकार आणि दोन षटकार खेचले. धवनची विकेट दासुन शनाकाने मिळवली. यष्टीपाठी निरोशन डिक्वेलाने त्याचा झेल घेतला. श्रीलंकेच्या रंगाना हेरथ (67), अँजोलो मॅथ्यूज (52) आणि लाहिरु थिरिमानेने (51) अर्धशतकी खेळी केली. भारताकडून भुवनेश्‍वर कुमार आणि मोहम्मद शमीने श्रीलंकेच्या पहिल्या डावात प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या.

10 चेंडूंत श्रीलंकेच्या तीन विकेट्स
सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या संघाने पहिला डाव पुढे नेताना 4 बाद 165 धावांवर पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी 52.4 षटकांमध्ये 200 धावांचा टप्पा गाठला. पण त्यानंतर 10 चेंडूमध्ये त्यांचे तिन फलंदाज झटपट बाद झाले. चौथ्या दिवशी 52.5 षटकांत मोहम्मद शमीने निरोशन डिक्वेलाला (35) बाद करत श्रीलंकेला पाचवा झटका दिला. निरोशनचा झेल विराटने पकडला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या दासुन शनाकाला (0) भुवनेश्‍वरकुमारने 53.3 षटकात पायचित केले. 54.2 षटकांमध्ये दिनेश चंडिमल बाद होणारा श्रीलंकेचा सातवा फलंदाज ठरला. शमीच्या गोलंदाजीवर यष्टीपाठी तो साहाद्वारे झेलबाद झाला. रंगाना हेरथ आणि दिलरुवान परेराने आठव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. शमीने 68.6 षटकात परेराची (5) विकेट मिळवत ही भागीदारी संपुष्टात आणली. हेरथने त्यानंतर सुरंगा लकमलच्या साथीने नवव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करत संघाची आघाडी वाढवली. भुवनेश्‍वरने हेरथची (67) विकेट आणि शमीने सुरंगा लकमलची दांडी गुल करत श्रीलंकेचा डावा संपुष्टात आणला.

34 वर्षांनंतर पुन्हा एकदा झाली पुनरावृत्ती
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 294 धावांवर रोखले. या डावातील भारतीय गोलंदाजी एका कारणासाठी वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील सर्व विकेट्स भारताच्या वेगवान गोलंदाजांनी मिळवल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 34 वर्षांनंतर वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचे 10 फलंदाज बाद केले आहेत. 1981 मध्ये मुंबईत खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 10 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर 1983 मध्ये अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्ध हा कारनामा केला होता. त्यानंतर 34 वर्षांनी रविवारी इडन गार्डनमध्ये वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केली. वेगावन गोलंदाज भुवनेश्‍वरकुमार, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या त्रिकुटाने श्रीलंकेच्या 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मागील काही वर्षांपासून भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांचाच बोलबाला जास्त राहीला होता.