फैजपुर। शहरातील धाडी नदीपात्रावरील पुलाच्या संरक्षण कठड्यांची गेल्या काही वर्षापासून दुरव्यवस्था झाल्याने या पुलाच्या 14 पायांपैकी तीन पायांचे पूर्ण तर दोन पायांचे अर्धवट मजबूतीकरण नुकतेच करण्यात आले आहे. हे काम करतांना गेल्या काही वर्षांपासून शेवटची घटका मोजत असलेल्या पुलाच्या संरक्षण कठड्यांची दुरुस्ती किंवा नुतनकरणासह सुरक्षित वाहतुकीच्या दष्टीने पुलाचा विस्तार करण्याचा बांधकाम विभागाला विसर पडला आहे. शहरातून अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग गेलेला आहे. या मार्गावरील फैजपुर शहरातील धाडी नदी पात्रावर पुलाचे बांधकाम सुमारे 45 वर्षापुर्वी झाले आहे. केळी पट्ट्याचा हा भाग असल्याने या मार्गाने विविध राज्यांमधील अवजड़ वाहनांची रात्रंदिवस या पुलावरून वर्दळ सुरु असते. या पुलाच्या संरक्षण कठड़यांची गेल्या चार पाच वर्षापासून हळूहळू तुटफुट होत असल्यामुळे व दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक पाहता या पुलाची दुरव्यवस्था होत आहे. याठिकाणावरुन पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरुन वापरावे लागते. अशी परिस्थिती असतांना या ठिकाणी वाहतुकीदरम्यान अपघातांचा धोका वाढला आहे.
बांधकाम विभागाकडून केवळ पाहणी
हा धोका टाळण्यासाठी संरक्षण कठड्यांची दुरुस्ती व पुलाचा विस्ताराची मागणी गेल्या एक-दोन वर्षापासून पुढे आली होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी गेल्या एक दीड वर्षापुर्वी पुलाची पाहणी केली होती. नंतर नुकतेच गेल्या दीड-दोन महिन्यापूर्वी या पुलाच्या 14 पैकी तीन पायांचे पूर्ण तर दोन पायांचे अर्धवट असे चार पायांचे मजबूतीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, या पुलाचे संरक्षण कठडे दोन्ही बाजूंनी ठिकठिकाणी गेल्या काही वर्षापासून तुटून पडझळ होत असल्यामुळे हे संरक्षण कठडे शेवटची घटका मोजत असून, त्यांची दुरुस्ती किंवा नुतनीकरण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
संरक्षण कठडे दुभंगले
सुभाष चौकाकडून सावद्याकडे जातांना पुलाच्या डाव्या बाजूने पंधरा फुट लांबिचे संरक्षण कठडे गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त काळापासून तुटले आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूने कठड्यांवरील प्लाष्टर उखडल्याने पाच फुटापेक्षा जास्त कठडा तुटलेला आहे. या संरक्षण कठड्यांची दुरव्यवस्था होऊन गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशी स्थिती असतांना संरक्षण कठड़्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाचे पायांचे मजबूती करण करतांना संरक्षण कठड्यांची दुरुस्ती करण्याचा विसर पडला आहे.
विस्ताराचा प्रश्न पडला मागे
या पुलाच्या संरक्षण कठड्यांच्या दुरुस्तीचा विषय गेल्या दीड दोन वर्षापुर्वी ऐरणीवर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ पातळीवरील अधिकार्यांनी या पुलाची पाहणी गेल्या एक दीड वर्षापुर्वी केली होती. एक दीड वर्षांनंतर पुलाच्या तीन पायांचे पूर्ण तर दोन पायांचे अर्धवट मजबूतीकरण नुकतेच दीड दोन महिन्यापूर्वी करण्यात आले. मात्र, संरक्षण कठड़यांची पतझळ होऊन शेवटची घटका मोजत असलेल्या संरक्षण कठड्यांची दुरुस्ती करण्याचा शिवाय पुलाच्या विस्ताराचा प्रश्न मागे पडला आहे. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या पुलाच्या पायांच्या मजबूती करणासाठी का पुलाच्या विस्तारासह संरक्षण कठड्यांच्या दुरुस्ती व नुतनिकरणासाठी पाहणी करुनही हा प्रश्र कायम आहे.