धानोरा ग्रामविस्तार अधिकार्‍यांची सभेला दांडी

0

आठ विषयांवरील चर्चेला बगल, गावाच्या विकासाला खिळ

धानोरा । ग्रामविकासाचे केंद्रबिदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला ग्रामविस्तार अधिकार्‍याने ऐनवेळी दांडी मारल्यामुळे विकासाच्या आठ विषयांवर चर्चा होवू शकली नाही. ग्रामविस्तार अधिकार्‍यांची दुपारपर्यंत वाट पाहिल्यानंतर सदस्यांनी देखिल घरचा रस्ता धरला. याबाबत अधिक माहीती अशी की, धानोरा ग्रामपंचायतीची मासिक सभा 28 रोजी सकाळी आयोजित केली होती. या संदर्भात ग्रामविस्तार अधिकारी माणिक पाटील यांनी स्वस्वाक्षरीने अंनिठे देखील सदस्यांना दिले होते. त्यामुळे 12 सदस्य मिटींगला उपस्थित असतांना ग्रामविस्तार अधिकारी हजर राहिले नाही. स्वच्छ भारतसह आदी विषयांवर महत्वपूर्ण चर्चा होणार असतांना देखील पाटील यांनी सभेला केराची टोपली दाखविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविस्तार अधिकारी या ना त्या कारणांमुळे दांडीयात्रेवर आहेत. ते गावात येत नसल्याने विकास कामांना खिळ बसली आहे.

मनमानी कारभार करत असल्याचा आरोप
वरिष्ठ पातळीवरही कोणी दखल घेतली जात नसल्याने ते मनमानी पद्धतीने कारभार चालवित असाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. त्यांच्या गैरहजेरीने दैनंदिन वसुलीचे कामेही ठप्प झाले आहे. तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ यांना शासन कामासाठी दाखले मिळत नसल्याने हाल होत आहे. आजच्या सभेसाठी सरपंच किर्ती पाटील, उपसरपंच अशोक साळुंके, ग्रामपंचायत सदस्य रामदास पारधी, मंगला पारधी, सुनिता भोई, कल्पना पाटील, अशोक महाजन, प्रकाश माळी, कैलास महाजन, राजमल महाजन, सुरेंद्र महाजन, अपेक्षा पाटील हे उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राम विस्तार अधिकारी माणिक पाटील हे येत नाही त्यामुळे विकासकामे रखडलेली असल्याने त्या उपसरपंच अशोक साळुंके यांनी केली आहे.