वेळेत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे झाली कारवाई
अडावद ता चोपडा(प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल उपसरपंच अशोक सुकदेव साळुंखे यांनी वेळेत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी ही कारवाई केली असून सदर कारवाई ३ डिसेंबर २०१८ रोजी केलेली आहे. परंतु कारवाई होऊन तब्बल चार महीने उलटले तरी आदेश ग्रामपंचायतला प्राप्त झाला नव्हता. म्हणुन सरपंच पती किरण मोहन पाटील यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दि. ९ एप्रिल २०१९ रोजी सदर अपात्र झाल्याचे पत्र मिळवले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धानोरा प्र. अ. ता. चोपडा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०१५ मध्ये झालेली आहे. सदर निवडणुकीत अशोक
सुकदेव साळुंके हे दि. ७ ऑगस्ट २०१५ रोजी राखीव प्रवर्गातून विजयी झाले होते. निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर करणे बंधनकारक होते. परंतु साळुंके यांनी जात प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे यथील सरपंच किर्ती पाटील यांचे पती किरण मोहन पाटील यांनी सदर सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असा अर्ज डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केला होता. त्यानुसार विवाद अर्ज मंजुर करण्यात आलेला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) प्रमाणे निकाल दिला. निकालात म्हटले आहे की, अशोक साळुंखे यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून सहा महीन्याच्या आत सादर न केल्यामुळे आदेशाच्या दिनांकापासुन ग्रामपंचायतचे सदस्य म्हणुन राहण्यास अपात्र घोषित करण्यात येत आहे.
अधिकार्यांची मिलीभगत
चार महिने उलटूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून धानोरा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक साळुंके यांचे अपात्र असल्याची आदेशाची प्रत तक्रारदारास अद्यापही न मिळाल्याने यामागे अधिकार्यांच्या संगनमताने या प्रकारावर पडदा टाकण्याचे प्रकार सुरु आहे कि काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान सुज्ञ नागरिकांच्या या पोलखोल प्रकारास शासनाचे अधिकारी पाठीमागे घालत असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावे अशी चर्चा गावात सुरु होती.
दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अशोक साळुंके अपात्र असल्याचे घोषित केले होते. दरम्यान संबंधितांनी या आदेशाची प्रत माझ्या पर्यंत पोहच केली नसल्याने मी पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यांकडे फेर अर्ज केला असता दि. ९ एप्रिल २०१९ रोजी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आदेशाचे पत्र प्राप्त केले. परंतु गेल्या ४ महिन्यांपासून या आदेशाचे पत्र न मिळाल्याने यामागील कारण मला समजू शकले नाही
किरण मोहन पाटील