धानोर्‍यात घरफोडी केल्याची जिगरची कबुली

0

जळगाव। एमआयडीसी पोलिसांनी घरफोड्या गुन्ह्यात अटक केलेल्या अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 22 रा.उमाळा, ता.जळगाव) याने चोपडा तालुक्यातील धानोरा येथेही घरफोडी केलेली असून तेथून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आतापर्यंत तीन गुन्ह्यातील 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच त्याने तीन दुचाक्या देखील काढून दिल्या आहेत. कुसुंबा येथील योगेश गजाननराव देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून 30 हजार रुपये किमतीचा एलसीडी व 12 हजार रुपये रोख चोरुन नेल्याच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर जिगरने केलेल्या घरफोड्यांची कबुली दिली आहे. यात त्याने धानोरा येथे केलेल्या घरफोडीचीही माहिती दिली. त्यामुळे रामकृष्ण पाटील, भगीरथ नन्नवरे, शरद भालेराव,नितीन बाविस्कर, मनोज सुरवाडे आदींचे पथक जिगरला घेऊन मंगळवारी घटनास्थळ पाहण्यासाठी धानोरा येथे गेले होते.

जिगर याच्याकडून तीन नव्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी कुसुंबा येथील मेडीकल चालकाची आहे तर दुसरी भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या पार्कींगमधून चोरी केली आहे. तिसरी दुचाकी ही नांदगाव येथील रेल्वे स्थानकाबाहेरुन चोरली आहे. त्यात आणखी एका दुचाकीची भर पडली आहे. धानोरा येथे घरफोडी केली त्याआधी त्याने त्याच गावातून दुचाकी चोरली आहे. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, गोलाणी मार्केटजवळ झालेल्या तीन लाखाच्या बॅग चोरणारे आरोपीही निषन्न झाले असून त्यातील एक पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे.

आरोपींची काढली कुंडली: जळगाव उपविभागात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेले चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविणे, बॅग लांबविणे, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी यासारख्या गुन्ह्यात पाच वर्षात अटक केलेल्या आरोपींची उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी कुंडली काढली आहे. त्यात किरकोळ घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक आरोपी आहेत. तर मोठ्या गुन्ह्यांमधील आरोपी हे जिल्ह्याच्या बाहेरचे असल्याचे उघड झाले आहे.