चोपडा। तालुक्यातील धानोरा येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली होती. या घटनेला 24 तास उलटत नाही. तोच दुसर्या दिवशीही तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली. यात एका घरातून 10 हजाराचा ऐवज लंपास केला. तर दोन घरातील चोरीत चोरांच्या हाती काहीच लागलेले नाही. तीनही ठिकाणी चोरट्यांनी दगडाच्या सहाय्याने कुलूप तोडले आहे. रविवारी आस्थानगर व महामार्गावरील एका घरात चोरी करीत चोरट्यांनी 20 हजाराचा ऐवज लंपास केला होता. सोमवारी 7 रोजी पहाटे चोरट्यांनी लक्ष्मीनगरातील गंगाधर भिवसन पाटील यांच्या घराचे कुलूप दगडाने तोडून आत प्रवेश केला. चोरांनी दोन हजार रूपये किंमतीचे लहान मुलांचे कडे, व आठ हजार रूपये रोख असा 10 हजाराचा ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी जगन वामन गुजर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. गुजर यांच्या घरात असलेले कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. मात्र चोरांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर सुवर्णसागार नगरातील रहिवाशी हरी काशिनाथ चौधरी यांच्या घरात भाडेकरू असलेले शिक्षक सीताराम तडवी हे बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. याठिकाणीही चोरांच्या हाती काहीच लागलेले नाही. पोलसांना घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुदर्शन आवारी यांनी भेट देऊन पहाणी केली. पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी, रवींद्र साळुंखे, इब्राहिम शहा यांनी पंचनमा केला.