धान्याच्या काळ्या बाजाराने आंगणवाडीतील चिमुकल्यांची उपासमार

0

मुरबाड : ग्रामिण भागातील बालकांच्या कुपोषणाने बालमृत्यु रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित असताना अंगणवाडीसाठी येणार्‍या धान्याचा पुरवठा अधिकार्‍याच्या संगनमताने काळा बाजार होत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून अंगणवाडीतील बालकांची उपासमार होत असल्याने पुरवठा विभागाचे कारभाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून हि उपासमार थांबविण्यासाठी नढंई येथील महिला बचत गटाने जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले आहेत.

रेशनिंग दुकाने धान्य माफियांचा अड्डा
मुरबाड तालुक्यातील 196 रास्त भाव दुकानदाराकडून गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार म्हणजे एक जोडधंदा असल्याने त्यामध्ये शेतकरी संघाकडे असणारी दुकाने व महिला बचत गटाकडे असणारी दुकाने हि या काळ्या बाजारामुळे तीन वेळा वेळा निलंबित होऊनही त्यांचेवर ठोस कारवाई होत नसल्याने ती दुकाने म्हणजे धान्य माफियांचा अड्डाच समजला जातो.

नागरिकांच्या तक्रारींकडे होतेय दुर्लक्ष
अशाच प्रकारे नढई येथील रास्त भाव दुकान हे स्थानिक नागरिकांचे तक्रारीमुळे चार वेळा निलंबित झालेले असताना पुरवठा विभागाने नागरिकांचे तक्रारीची दखल न घेता त्याला प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याने वेळोवेळी गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार सुरूच ठेवला असल्याने कार्डधारकांची दिवसेंदिवस उपासमार होतेच, शिवाय अंगणवाडीला मिळणारे धान्यदेखील संबंधित दुकानदार हा गेले तीन वर्षांपासून काही ना काही कारण पुढे करत परस्पर लंपास करत असल्याने त्यांना शासनाने दिलेली शिधापत्रिका हि कोरीच राहिली आहे.

पुरवठा अधिकारी गौतम खरातांवर कारवाईची मागणी
त्यामुळे या चिमुकल्यांच्या आहाराची जबाबदारी घेत आसलेल्या महिला बचत गटाच्या महिला या उसनवार घेऊन त्यांची भुक भागवत आहेत. या दुकानदाराला पाठिशी घालणारे पुरवठा अधिकारी गौतम खरात यांचेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी स्थानिक महिला बचत गटाने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन साकडे घातले आहेत.

या अंगणवाडी धान्य पुरवठा होत नाही याची एकदाही तक्रार माझ्याकडे आली नाही. त्यामुळे दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
– गौतम खरात, पुरवठा अधिकारी, मुरबाड.

आंगणवाडीतील आहाराची जबाबदारी हि संबंधित महिला बचत गटाकडे असून त्या कधीच धान्य घेण्यासाठी दुकानात येत नसून मला केवळ बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
-संजय दशरथ टोहके, दुकानदार .