धान्यासाठी भुसावळात तहसीलदारांना घेराव

0

कुर्‍ह्यात धान्य न मिळाल्याने लाभार्थी भुसावळ तहसीलवर धडकले ; जि.प.सदस्यांकडून प्रशासन फैलावर ; आधार सिडींगअभावी लाभार्थींची फरफट ; तहसीलच्या भोंगळ कारभाराने संताप

भुसावळ- स्वस्त धान्य वितरणातील अपहाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने ई पॉस प्रणाली अंमलात आणली असलीतरी स्थानिक तहसील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे लाभार्थींचे आधार सिडींग न झाल्याने शहरासह ग्रामीण भागात स्वस्त धान्य वितरणाचा बोजवारा उडाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून या उद्रेक होत असून तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वीच घराव घालण्याची घटना ताजी असताना गुरुवारीदेखील तालुक्यातील कुर्‍हे पानाचे गावातील लाभार्थींचा संयम सुटल्याने त्यांनी तहसीलदार महेंद्र पवार यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. याप्रसंगी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढत तातडीने सुधारणा करून लाभार्थींना धान्य मिळण्याबाबत तहसीलदारांना खडेबोल सुनावले.

ग्रामस्थांच्या मोर्चाने खळबळ
दोन दिवसांपूर्वी शहरातील पंचशील नगरासह जुना सातारा भागातील नागरीकांनी तहसीलवर मोर्चा काढत प्रशासनाचे वाभाडे काढले होते तर तालुक्यातील कुर्‍हे पानाचे गावातील लाभार्थींना स्वस्त धान्याचे वितरण न झाल्याने संतप्त वयोवृद्ध महिलांसह पुरूषांनी तहसीलवर गुरुवारी दुपारी धडक मोर्चा आणत तहसीलदार महेंद्र पवार यांना घराव घातला. रेशन दुकानदारांना आधाारकार्डसह अन्य आवश्यक कागदपत्रे दिल्यावरही मे महिन्यापासून धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनाही ग्रामस्थांनी मोर्चाची कल्पना देत त्यांना पाचारण केली. यावेळी सावकारे यांनी लाभार्थींच्या समस्या ऐकून घेत तहसील प्रशासनाला याबाबत जाब विचारला. वारंवार दुकानदारांकडे कागदपत्रे दिल्यावरही कागदपत्रे गहाळ होत असल्याचा आरोप प्रसंगी करण्यात आला.

आधार सिडींगसाठी गरीबांची लूट
कुर्‍हा येथील रेशन दुकानदार हे लाभार्थींकडून आधार सिडींगसाठी सुमारे शंभर रुपये घेत असल्याचा आरोप जिल्हा परीषद सदस्या सावकारे यांनी तहसीलदारांकडे केला. रेशन दुकानदारांची सुरू असलेली मनमानी थांबविण्याची मागणी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. या संदर्भात दखल घेवून कारवाई करणार असल्याचे तहसीलदार म्हणाले.

ऑफलाईन धान्य वितरण बंद
आतापर्यत ऑफ लाईन धान्याचे वितरण झाले मात्र आता ते बंद करण्यात आले आहे. ज्या लाभार्थींना धान्य मिळालेले नाही त्यांनी तातडीने आपापल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे कागदपत्रे जमा करावी तसेच ज्यांनी कागदपत्रे दिली आहेत त्यांना 10 जूनपर्यत तयार होणार्‍या यादीत नाव आल्यावर धान्याचे वितरण केले जाणार असल्याचे ते म्हणाले. ई पॉस मशीनद्वारेच आता धान्य मिळणार असल्याचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.