धान्य वितरणासाठी संगणक प्रणाली

0

पुणे । राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने संगणकीकृत यंत्रणा विकसित केली असून या प्रणालीमुळे अन्नधान्य वाहतूक आणि धान्य वितरण यंत्रणेमध्ये पारदर्शकता येणार असून संपूर्ण माहिती आता मोबाइलवरसुद्धा उपलब्ध होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

कार्यालयांसाठी स्वतंत्र अर्ज
या प्रणालीद्वारे जिल्हा अधिकारी कार्यालय, गोदाम कार्यालय, विभागीय कार्यालय अशा वेगवेगळ्या कार्यालयांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने सर्व लाभार्थींना धान्य घेतल्यानंतर एसएमएस येईल. ट्रक चलन निर्मितीमध्ये देखील चटकन चलन काढता येईल. येत्या महिन्यामध्ये ‘जीआरएस’प्रणाली बसवली जाणार असून अन्नधान्य विभागासाठी एक खिडकी योजना कार्यान्वयित करण्यात येणार आहे. यामुळे धान्याची चोरी आणि काळाबाजार बंद होऊन योग्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत धान्य पोहचेल, असा विश्‍वास बापट यांनी व्यक्त केला.

रास्त भाव दुकानांना वाटप
धान्य गोदामामध्ये येण्याआधी त्याचे वजन केले जाईल त्यानंतर मागणीनुसार त्या-त्या रास्त भाव दुकानांना त्याचे वाटप केले जाईल. ऑनलाइन प्रणाली असल्याने यामध्ये काही तफावत असल्यास लगेच लक्षात येईल. या प्रणालीमुळे अधिकारी अन्य ठिकाणाहून मिळवलेल्या नोंदीही ठेवू शकतात. सध्या ही प्रणाली आपण साखरेच्या बाबतीत वापरत आहोत. सप्लाय चेन मॅनेजमेंटमुळे रास्त भाव दुकानांसाठी परवाना घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.

‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ही ऑनलाइन प्रणाली
‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ ही ऑनलाइन प्रणाली राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केली असून यायिषयी माहिती देताना बापट म्हणाले, यामुळे प्रत्येक गोडाउनमधील अन्नधान्याचे व्यवस्थापन करता येऊ शकते. तसेच कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला अन्न व पुरवठा विभागाकडून रास्त भाव दुकानदारांना किती अन्नधान्य वाटप केले हे पाहता येईल. धान्य वाहतूक करणार्‍या ट्रकचे चलन ही ऑनलाइन काढले जाईल. ज्यामुळे धान्य वाहतूक करणारा ट्रक भारतीय अन्न महामंडळ ते राज्य शासनाचे गोदाम तसेच गोदाम ते रास्त भाव दुकान किती वेळात पोहचतो, याच्या नोंदी ठेवणे सोपे जाईल तसेच ट्रक चालकाचे नाव, मोबाईल नंबर याची ही नोंद विभागातील अधिकार्‍यांना ठेवता येईल. यामुळे धान्य घेऊन जाणारा ट्रक कोठे थांबल्यास त्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना समजेल.