महामार्गावर हॉटेल अशोका जवळील घटना: अपघातानंतर कारचालक फरार
जळगाव: महामार्गावर समोरुन ओव्हरटेक करुन भरधाव येत असलेल्या कारचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक बे्रक दाबल्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीचा हुक तुटला तसेच ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ते पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दाबला जावून चालक दिपक जगन्नाथ महाजन वय 30 रा. अंचळगाव ता. भडगाव यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास महामार्गावरील प्रवेशव्दाराजवळ घडली. अपघाताला जबाबदार कारचालक घटनास्थळावर कार सोडून पसार झाला होता. घटनेने महामार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी के्रनद्वारे ट्रॅक्टर बाजूला करुन मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविला. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मृत्यूचा सापळा झालेला हा अरुंद महामार्ग आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न चालकाच्या मृत्यूनंतर पुन्हा उपस्थित झाला.
चुलतभाऊही बसणार होता त्याच ट्रॅक्टरमध्ये
अपघातापूर्वी एका ठिकाणी दोन्ही ट्रॅक्टर थांबले. याठिकाणी एका पानटपरीवर तंबाखु, गुटखा घेतला. दिपक महाजनेही गुटखा घेतला. यावेळी मागील ट्रॅक्टरवर बसलेला चुलतभाऊ मोहन महाजन हा दिपकला मी तुझ्या सोबत बसतो असे म्हणाला. तो ट्रॅक्टरवर समोर बसलाही. मोठा असल्याने मोहनसमोर गुटखा खाता येणार नाही, त्यामुळे दिपकने त्याला सर्व जण माझ्या ट्रॅक्टरवर बसू नका, मागच्या ट्रॅक्टरवर बसा असे सांगत, मोहनला जाण्यास सांगितले. मोहन मागच्या ट्रॅक्टरवर बसला. आणि काही अंतरावर हा अपघात झाला. यात दिपकचा मृत्यू झाला. सोबत मोहन बसलेला असता, त्यालाही दुखापत होवून दुर्घटना घडली असती. पण मोहनसाठी काळही आला नव्हता, आणि वेळही आली नव्हता, याची प्रचिती आली. डोळ्यासमोर भावाच्या अपघाती मृत्यूने मोहनला अश्रू अनावर झाले होते.
ओव्हरटेकच्या नादात कार ट्रॅक्टरवर आदळली
महामार्गावरुन गावाकडे जात असतांना पाळधीकडून जळगाव शहराकडे येणार्या कार (एम.एच.20 बी.वाय.4500) समोरील कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दिपक महाजन याच्या पाळधीकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली आदळली. तत्पूर्वी कारला वाचविण्याचा प्रयत्न म्हणून ट्रॅक्टरचालक दिपक महाजन याने बे्रक दाबून ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. याचठिकाणी घात झाला. जोरात बे्रम दाबल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमधील हुक तुटला, ट्रॅक्टर व चार्याने भरलेली ट्रॉली पलटी झाली. यात ट्रॅक्टरखाली आल्याने चालक दिपक महाजन याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार मधून चालक बाहेर पडला. व पसार झाला. कारचालकाचा लॅपटॉप असलेली बॅग तसेच काही कारमधील सामान पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान कारचालकाचे नाव उदय पाटील असून तो औरंगाबाद येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
चुलतभाऊ, मित्रांसह गावाहून आले चारा घ्यायला
भडगाव तालुक्यातील अंजळगाव येथील महारु हिंमत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जुने ट्रॅक्टर खरेदी केले होती. या ट्रॅक्टरवर चालक म्हणून दिपक महाजन कामाला होता. शुक्रवारी गावातील दोन जणांना चारा आणायचा होता. यासाठी दीपक महाजन त्याचा चुलत भाऊ मोहन रमेश महाजन हे दोन वेगवेगळे ट्रॅक्टर घेवून ममुराबादला चारा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता निघाले. यावेळी त्याच्या सोबत प्रशांत पाटील, भाऊसाहेब मिस्तरी हे होते. ममुराबाद येथून दोघा ट्रॅक्टरमध्ये चारा भरला. यानंतर दिपक महाजन हा त्याच्याकडील ट्रॅक्टर ट्रॉलीसह (एम.एच.19 बी.जे.5237 ) पुढे निघाला, त्याच्यापाठोपाठ चुलत भावाचे ट्रॅक्टर चालत होते.
भेट झाली नाही अन् घडले मावशीला अंत्यदर्शन
मयत दिपक महाजन याची असोदा येथे मावशी राहते. सकाळी गावाहून निघण्यापूर्वी त्याने मावशी इंदुबाई तसे मावसभाऊ रविंद्र माळी यांना फोनवरुन मी ममुराबादला येतोय, असे कळविले होते. मावशीने भेटण्यास ये, असे सांगितल्यावर दिपक येतो असे म्हणाला होता. ममुराबादहून चारा भरल्यानंतर मावशीची भेट न घेताच दिपक निघून गेला. दिपकची प्रतिक्षा करुनही तो येत नसल्याने अखेर मावसभावाने ममुराबाद गाठले. मात्र दिपक तेथून निघून गेला होता. यानंतर त्याने दिपकला मोबाईलवर फोन केले. मात्र दिपककडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मावसभाऊ रविंद्रने याने अंजळगावला फोन केला. यावेळी रविंद्रला अपघात झाल्याचे कळले. रविंद्रने तत्काळ असोद्याहून आई रत्नाबाई हिला सोबत घेतले. व जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी मावशी रत्नाबाई यांनी रुग्णवाहिका पोहताच दिपकचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. पोर्या मला भेटायला येणार होता ना… पण न भेटता निघून गेला…माय व दिपकले दोन छोटे छोटे मुले आहेत, त्यांचे कसे होईल, असे म्हणत त्या तसेच सोबत मावसभाऊ रविंद्रही आक्रोश करत होता.
मुलाच्या मृत्यूने वृध्द वडील चक्कर येवून पडले
दिपकच्या पश्चात वडील जगन्नाथ ओंकार महाजन, आई वस्तलाबाई, पत्नी भावना, मुलगा लकी (5 वर्ष) , हितेश (अडीच वर्ष), लहान भाऊ देवानंद असा परिवार आहे. वडील तसेच लहान भाऊ शेती करतात. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जगन्नाथ व वत्सलाबाई या दाम्पत्यांना दोन मुले झाली होती. त्यात दिपकचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या दोन मुलांचे पितृछत्र हरपले आहे. दिपक हाच कर्तापुरूष होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच वडीलांनी गावाहून जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी मुलाच्या मृत्यूने त्यांना धक्का बसला. मृतदेह पाहताच त्यांना चक्कर आले व खाली पडले. त्यांनाही नातेवाईकांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले. उशीरापर्यंत शवविच्छेदन करुन मृतदेह हलविण्यात आला होता.
क्रेनव्दारे ट्रॅक्टर बाजूला करुन मृतदेह काढला
अपघातानंतर मोठ्याने आवाज अपघातानंतर घटनास्थळी ये-जा करणार्या वाहधारकांसह विद्यापीठातील विद्यार्थी शिक्षकांनी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग, पाळधी तसेच वाहतूक व तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्त उलटलेल्या ट्रॅक्टरमुळे महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. महार्गा पोलीस घनशाम पवार, प्रणित रणीत, प्रदीप बडगुजर, सुनील पाटील, हितेश पाटील, चंद्रकात पाटील यांच्यासह वाहतूक पोलिसांनी मदतकार्य केले. जैन इरिगेशनचे के्रनमशीन बोलाविण्यात आले. चालक शिवदास सपकाळे यांनी क्रेनव्दारे ट्रॅक्टर बाजूला केले. यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन वाहतूक अर्धातासानंतर वाहतूक सुरळीत केली.