धामणदे फाट्यावर सिनेस्टाईल लूट ; रोकड न देणार्‍या क्लीनरवर दोन गोळ्या झाडल्या

0

चालकाला मारला चाकू ; दहा हजारांची रोकड लुटून दरोडेखोर पसार

मुक्ताईनगर- तालुक्यातील धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास मुंबई पासिंगच्या वाहनाने आलेल्या पाच दरोडेखोरांनी ट्रक चालकाला चाकू लावत रोकड मागितली मात्र याचवेळी क्लीनरने आरडा-ओरड केल्याने त्याच्यावर तोंडावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला तर दरोडेखोरांनी चालकाच्या पोटात चाकू मारून दहा हजारांच्या रोकडसह मोबाईल, एटीएम कार्ड लुटून पोबारा केला. सिनेस्टाईल झालेल्या लूटप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधार्थ सर्वत्र नाकाबंदी लावली आहे तर बुलढाण्यासह बर्‍हाणपूर येथे पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

तपासणी नाके चुकवणे ट्रक चालक-क्लीनरच्या जीवावर
अंतुर्ली-बेलसवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील धामणदे फाट्यालगत अकोला येथून उडीदाचे कडधान्य घेवून इंदूरकडे ट्रक (क्रमांक एम.पी-09 सी.एफ.9676) जात असताना मुंबई पासिंगच्या काळ्या रंगाच्या चारचाकीने ओव्हरटेक करीत ट्रकच्या पुढे वाहन लावून ट्रक थांबवला. काही कळण्याआत चालकाच्या बाजूने दोन तर क्लीनरच्या बाजूने दोघे ट्रकमध्ये शिरले व त्यांनी रोख रकमेची मागणी केली मात्र रक्कम न दिल्याने दरोडेखोरांनी ट्रक चालक मोहंमद इलियास मो.मुक्तार शेख (25, गुलजारपूरा, रा.अकोला) यांच्या पोटात चाकू मारला तर क्लिनर अलीम सलीम शेख (वय 25, रा.अकोला) याने आरडा-ओरड केल्याने त्याच्यावर गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या तर एक गोळी तोंडाबाहेर पडली. दरोडेखोरांनी ट्रक चालकाकडील दहा हजारांच्या रोकडसह एटीएम कार्ड व मोबाईल लुटून पोबारा केला. सुरुवातीला दोघांवर अंतुर्ली येथे प्राथमिक उपचार करण्यात आले तर क्लीनरची प्रकृती अधिक खालावल्याने त्यास इंदौर येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी धाव घेतली तर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनीही माहिती जाणून घेतली. तपासणी नाके चुकवून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या या वाहनचालक व क्लिनरच्या जीवावर हा आडमार्गाची वाहतूक बेतली आहे.

नाकाबंदी लावून दरोडेखोरांचा शोध
दरोड्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी भुसावळ विभागातील रावेर, मुक्ताईनगर, बजहाणपूर या भागात नाकेबंदी लावण्यात आली आहे. या भागात हॉटेल व धाब्यावर कसून तपासणी केली जात असून बर्‍हाणपूरसह बुलढाण्यात पोलिसांचे पथक तपासासाठी रवाना झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे यांनी दिली. ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.