पिंपरी-चिंचवड (आकाश मोरे): मावळातील धामणे गावातील दरोड्याची घटना तळेगाव पोलिसांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. कायदा, सुव्यस्था व शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी आता अंगावरची धूळ झटकून कंबर कसण्याची वेळ आली आहे. मावळ भागात मंगळवारी घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी; तितकीच मनाला चटका लावणारी आहे. ग्रामस्थांनी अप्रत्यक्षरित्या वेळोवेळी अशा घटनेबाबत सावधानतेचा इशारा पोलिसांना दिला होता. मात्र, सुस्तावलेल्या पोलिसांना जाग न आल्यानेच फाले कुटुंबातील तीन निष्पाप जीव गेले, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
लांडगा आला रे… आला..
चोर आले आहेत… चोर आले आहेत… अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून मावळ परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरू होती. चावडी तसेच कट्ट्यांवर अशा चर्चांना उधाण आले होते. हे चोर म्हणजे नेमके कोण असावे, असा प्रतिप्रश्न एकमेकांना विचारला जात होता. काही जणांच्या मते गावातीलच काही टपोरी पोरं किंवा तळीराम असतील, असे वाटत होते. तर काहींच्या मते फासेपारधी असतील. मात्र, या प्रश्नाचे उत्तर नेमके कोणाला मिळाले नाही. हे कोेडे ज्यावेळी सुटले; त्यावेळी ग्रामस्थांचा अंदाज खरा ठरला. मंगळवारी फाले कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये जे घडले. ते पूर्वनियोजित आणि पाळत ठेऊन केलेले कृत्य असल्याची चर्चा संपूर्ण मावळ परिसरामध्ये रंगली आहे. घटना घडण्यापूर्वी दरोडेखोरांनी या भागाची टेहळणी करून परिस्थितीचा अंदाज घेतला असावा; या गावामध्ये एकूण घरे किती, लोकसंख्या किती आहे? याची ढोबळ माहिती दरोडेखोरांकडे उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हल्ला करताना दरोडेखोरांचा केवळ चोरीचा उद्देश नसावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण ज्या पद्धतीनेे या तिघांवर जीवघेणा हल्ला झाला आहे; यावरून दरोडेखोरांनी केलेला हल्ला हा केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने झाला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनीदेखील त्यादृष्टीने तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत.
पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर…
ग्रामस्थांच्या चर्चेकडे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज होती. गावात चोर आले असल्याची केवळ अफवा आहे, असे म्हणून पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी जर गावांमध्ये गस्त सुरू केली असती तर आज फाले कुटुंबावर ही वेळ आली नसती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. परंतु, झोपेचे सोंग घेणारे तळेगाव पोलिस खडबडून जागे झाले ते निष्पाप तिघांचा जीव गेल्यानंतर.
चड्डी बनियान टोळी पुन्हा सक्रीय होण्याची भीती
देहूरोडमधील भंडारा डोंगर पायथ्याजवळ गेल्या दोन वर्षांपासून फासेपारधी समाजाच्या लोकांनी झोपड्या थाटलेल्या आहेत. हे लोक नेमके कोणत्या भागातून आलेले आहेत, यामध्ये पुरूष व महिला तसेच बालकांची संख्या किती आहे, या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन काय, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पोलिस दप्तरी त्यांची कोणतीही नोंद नाही. तीन ते चार वर्षांपूर्वी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव ते लोणावळा या पट्ट्यामध्ये वाहनांना अडवून लुटमार करणारी चड्डी बनियान टोळी सक्रीय झाली होती. दरम्यान, ही सर्व मंडळी फासेपारधी समाज व परप्रांतियांशी निगडीत असल्याचे पोलिस तपासामध्ये निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अशा दोषींवर कारवाई केल्यानंतर हे लोक या भागातून दुसरीकडे स्थलांतरीत झाले होते. मात्र, मावळ परिसरामध्ये पुन्हा वस्ती वाढली असून, पोलिसांनी या सर्वांची नोंद घेणे गरजेचे आहे.