धामणेत सशस्त्र दरोडा; तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरलेे!

0

लोणावळा/वडगाव मावळ : मावळ येथील धामणे गावात शेतवस्तीवर राहणार्‍या नथू विठोबा फाले यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. यावेळी दरोडेखोरांनी नथू विठोबा फाले (वय 65), त्यांच्या पत्नी सबाबाई नथू फाले (वय 63), मुलगा अत्रीनंदन तथा आबा नथू फाले (वय 30) यांच्यासह त्यांची सून, नातवंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. फाले पती-पत्नीसह मुलाच्या डोक्यात टिकाव घालून त्यांचा अत्यंत निर्घृण खून केला. तर दरोडेखोरांच्या मारहाणीत सून व नातवंडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मध्यरात्रीनंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील दागदागिणे, रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले आहे. फाले कुटुंबीय हे वारकरी होते. तसेच नथू फाले हे ज्येष्ठ टाळकरी होते. त्यांच्या या हत्याकांडाने मावळ परिसर हादरून गेला आहे. सकाळी पहाटे ही थरारक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावात तीन ते चार ठिकाणी दरोडेखोरांनी चोरीचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले. सोमाटणे फाटा येथून जवळच असलेल्या या शेतवस्तीवर दरोडेखोर वाहनातून आले असावेत, असा पोलिसांनी अंदाज वर्तविला. तळेगाव पोलिस कसून शोध घेत होते.

नाती वाचल्या, सुनेवरही प्राणघातक हल्ला
तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी फाले कुटुंबीयांच्या डोक्यात टिकावचे घाव घालून त्यांचा निर्घृण खून केला. फाले पती-पत्नीसह त्यांच्या मुलाने दरोडेखोरांना विरोध केल्याने त्यांनी हे नृशंस कृत्य केले असावे. बराचवेळ या घरात दरोडेखोरांचा नंगानाच सुरु होता. तत्पूर्वी त्यांनी धामणे गावात दुकाने व घरफोडीचाही प्रयत्न केला होता. या घटनेमुळे तळेगाव पोलिसांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला असून, पोलिस रात्रीची गस्त घालत नाहीत, असा संताप गावकर्‍यांनी व्यक्त केला. शिवाय, दरोड्याची माहिती देण्यासही पोलिस टाळाटाळ करत होते. घरातील व अंगावरील दागिणे, रोख रक्कम आणि इतर काही ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झालेत. सकाळी गंभीर जखमींना ग्रामस्थांनीच रुग्णालयात हलवले. मृतक फाले यांच्या सून तेजश्री (वय 25), नात अंजली (वय 6) या गंभीर जखमी झाल्या आहेत. पैकी तेजश्री यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरोडेखोर नेमके किती होते हे कळू शकले नाही. परंतु, पहाटे बराचवेळ त्यांचा फाले यांच्या घरात धुमाकूळ सुरु होता. कुटुंबातील प्रत्येकावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला. फाले यांचे घर गावापासून थोडे दूर शेतावर आहे. दरोडेखोर घरात घुसले तेव्हा घरात एकूण सातजण होते. त्यापैकी अनुष्का व ईश्‍वरी या नाती सुखरुप आहेत.

मावळ तालुक्यात संतापाची लाट
फाले यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी धामणे गावातील दोन-तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. या दरोड्यामुळे मावळ परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तसेच, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. रात्रभर दरोडेखोर धिंगाणा घालत असताना तळेगाव पोलिस झोपा काढत होते का? असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारत होते. या घटनेची माहिती देण्यासही पोलिस टाळाटाळ करित होते. नथू फाले हे मावळ तालुक्यातील ज्येष्ठ टाळकरी होते. तालुक्यातील बहुतांश हरिनाम सप्ताहांत त्यांचा सहभाग रहात असे. हभप. फालेमामा या नावाने ते वारकरी संप्रादयात ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबावरील या अमानुष हल्ल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पहाटे पोलिस निरीक्षक मुगुट पाटील, वरिष्ठ अधिकारी व श्‍वान पथकाने घटनास्थळी धाव घेतली व दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुपारी साडेचार वाजेपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. तरीही पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली होती.