धामोडीत तुंबळ हाणामारी : दोन्ही गटाच्या 27 जणांविरूद्ध गुन्हा

0

निंभोरा/खिर्डी : मुलांच्या झालेल्या किरकोळ वादातून रावेर तालुक्यातील धामोडी गावात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना 1 रोजी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली. या हाणामारीत दगड-विटांचा जोरदार मारा करण्यात आल्याने दोन्ही गटाचे चौघे जखमी झाले आहेत. दंगल प्रकरणी निंभोरा पोलिसात दोन्ही गटाच्या 27 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एका गटाने जातीवाचक शिवीगाळ करीत धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.

दंगलीत चौघे जखमी : गावात तणावपूर्ण शांतता
दोन्ही गटाने केलेल्या दगडफेकीत वत्सलाबाई संजय मेढे, टोपलू देवचंद मेढे, आकाश संजय पाटील व गोपाळ श्रावण पाटील हे जखमी झाले आहेत. फजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, निंभोर्‍याचे सहाय्यक निरीक्षक महेश जानकर, उपनिरीक्षक योगेश शिंदे आदींनी भेट देत शांततेचे आवाहन केले. गावात निंभोरा पोलिसांसह जळगाव येथून आरसीपी प्लाटून व दंगा पथकाला पाचारण करण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामस्थांना गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पहिल्या गटाच्या फिर्यादीनुसार 14 जणांविरुद्ध गुन्हा
पहिल्या गटातर्फे विनोद जगन्नाथ मेढे (रा.धामोडी) यांनी फिर्याद दिल्यावरून 14 संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपींमध्ये योगेश वासुदेव पाटील, रत्नाकर वसंत महाजन, आकाश उर्फ सोनू संजय पाटील, गोपाळ वसंत महाजन, योगेश मधुकर पाटील, ठकुलाल शांताराम पाटील, पवन पितांबर पाटील, प्रल्हाद दिनकर पाटील, धीरज संजय पाटील, संजय श्रावण पाटील, गोपाळ श्रावण पाटील, रमेश मोतीलाल पाटील, दिलीप वासुदेव पाटील, शारदाबाई श्रावण पाटील यांच्याविरुद्ध दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी दगड-विटांचा मारा केल्याने वत्सलाबाई मेढे व टोपलू देवचंद मेढे जखमी झाले.

दुसर्‍या गटाच्या 13 जणांविरूद्ध गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे आकाश संजय पाटील यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचा भाऊ उमेश पाटील यांच्याशी झालेल्या भांडणानंतर संशयीत आरोपी जितेंद्र संजय मेढे, अजय अरुण मेढे, ईश्वर किशोर मेढे, दीपक किशोर मेढे, किरण टोपलु मेढे, विशाल अनिल मेढे, विशाल विनोद मेढे, संजय कालिदास मेढे, सुरज विनोद मेढे, भूषण गौतम मोरे, शुभम टोपलु मेढे, प्रमोद राजधर मेढे, विनोद जगन्नाथ मेढे (सर्व रा.धामोडी, ता.रावेर) यांच्याविरुद्ध दंगल तसेच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी लोखंडी कडा, फायटर, दगड, विटा तसेच लाकडी दांड्याने हल्ला चढवल्याने फिर्यादी आकाश संजय पाटील तसेच गोपाळ श्रावण पाटील जखमी झाले.