धारागीर येथे एकाच रात्री पाच घरफोड्या

0

एरंडोल । तालुक्यातील धारागीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गावात 20 जून रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सहा ठिकाणी एकाच वेळे घरफोड्या करून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. तर बाकी दोन घरात चोरट्यांना मात्र खाली हात परतावे लागले. घरफोडी झालेले सर्व नागरिक शेतकरी असून खरिपाच्या पेरणीसाठी असलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्यामुळे सर्व कुटुंब अत्यंत भावनाविवश झाले होते.

काहीही न मिळाल्याने सामानाची नासधूस
तिसर्‍या घटनेत सुनील सुभाष पाटील यांच्या घरातून देखील सात ग्रम सोने व खरिपाच्या पेरणीसाठी असलेले 85 हजार रुपये रोख करून नेले. त्यांचे वडील सुभाष दयाराम पाटील यांच्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडून सोळाशे रुपये चोरट्यांनी लांबवले. आनंदा धोंडू पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने व चांदीचे देव चोरण्यात आले. तर अशोक आनंदा पाटील यांच्या घरातून चांदीच्या मुर्त्या लांबविल्या. त्यांच्या घरातील दोन कपाटे चोरट्यांनी फोडले मात्र त्यात त्यांना काहीही सापडले नाही. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिला होता. चोरटे चोरी करत असतांना पाचही परीवारातील सदस्य बाहेर व गच्चीवर झोपलेले होते. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती दिली.

दागिने, मुर्त्यांसह रोकड लंपास
धारागीर येथे काल रात्री पाच ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या. यात जयदेव धोंडू पाटील हे ओसरीत झोपले होते व पाटील यांचा लहान मुलगा घराच्या मागील बेडरूम मध्ये झोपलेला होता. तर त्यांचेकडे आलेले पाहुणे गच्चीवर झोपलेले असतांना चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला .व घरातील मधल्या खोलीत असलेल्या गोदरेज कपाटाचे कुलूप तोडुन त्यातील 31 ग्रॉम, 17 ग्रॉम व 8 ग्रॉम वजनाच्या 3 सोन्याच्या पोत, 10 ग्रॉम वजनाच्या तीन अंगठ्या, 2 ग्रॉम वजनाच्या तीन अंगठ्या, तसेच टोंगलच्या तीन जोड्या, तीन नथ असे सुमारे 115 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बावीस भार वजनाचे चांदीचे जोडवे, चांदीच्या देवांच्या मुर्त्या व माळ, पाच हजार रुपये रोख असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असुन मागील गल्लीतील संजय सुभाष पाटील यांच्या घराचा दरवाजा तोडून 6 हजार रुपये रोख, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या, चांदीच्या साखळ्या असा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे कपाटात असलेली जयश्री पाटील यांच्या नावाची एक लाख पाच हजार रुपयांची स्टेट बँकेची मुदत ठेवीची पावती देखील चोरट्यांनी लांबवली.

उंबरखेड येथे दुकाने फोडून चोरांचा हैदोस
चाळीसगाव । तालुक्यातील उंबरखेड येथे 19 व 20 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी आझाद मैदानात असलेल्या ग्रामपंचायत व्यापारी संकुलामधील दुकाने फोडून रोख रकमेसह इतर वस्तू चोरून नेल्याने उंबरखेड परिसरात खळबळ उडाली असून मेहुणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला सर्वोदय डेअरीचे उमेश प्रकाश करपे (32, रा.उंबरखेड ता.चाळीसगाव) यांनी फिर्याद दिली कि, सोमवारी 19 जून रोजी रात्री 10 ते मंगळवारी 20 जून 2017 रोजी पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यात अज्ञात चोरटयांनी उंबरखेड गावातील आझाद मैदानात असलेल्या ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील त्यांच्या डेअरीचे शटर तोडून आतमध्ये कपाटाचे लॉकर तोडून 42 हजार रुपयाची रोकड चोरून नेली आहे. तर शेजारीच असलेल्या व्यापारी संकुलातील सुमतीलाल कोठारी यांच्या महावीर किराणा दुकान फोडून आतील गळ्यातील 12 हजार रुपये चोरून नेले आहे. तर हाशिम मुल्ला मोमीन यांच्या मोबाईल दुकानातून 25 हजार रुपये किमतीचे मोबाईल व 20 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. त्याचप्रमाणे रवींद्र पंढरीनाथ वाणी यांच्या दिव्या ऍग्रो बियाणे दुकानातून 25 हजार रुपये रोख लांबवले आहेत. एवढयावरच न थांबता चोरटयांनी त्याच कॉप्म्लेक्स मधील योगेश हरी वाणी यांच्या मोबाईल दुकानांमधून 20 हजार रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य चोरून नेले. तर एका बंद घराच्या कडी कोयंडा तोडून घरातील कपाटात असलेले 12 हजार रुपये चोरून नेले आहेत. झालेल्या चोर्‍यांमुळे उंबरखेड परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

घरफोडीची पोलिसात नोंद
एकाच वेळी पाच ठिकाणी चोरी झाल्यामुळे चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. यावेळी जळगाव येथुन श्वान पथकही आले होते व ते गावातच शंभर ते दीडशे मिटर आसपास चोरी झालेल्या घरांजवळ घुटमळले, ठसे तज्ञांनी चोरी झालेल्या घरातील ठसे घेतले. दरम्यान चोरी झालेल्या चारही घरापैकी जयदेव पाटील यांच्या सुना व नातवंडांचे संपूर्ण दागिने चोरट्यांनी लंपास केले. सदर दागिन्यांचे खोके बाहेर नेऊन दागिने काढुन रिकामे खोके घराच्या अंगणातच फेकलेले होते. याचोरीचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे करीत आहेत.