पुणे । जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावा-गावांत नोंदणी न केलेल्या सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मशीद, गुरुद्वारा, दर्गा यांची माहिती त्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी त्वरित सादर करावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.डिगे यांनी तीन दिवसांपूर्वी राज्यातील अनोंदणीकृत असलेल्या धार्मिक स्थळांंची नोंद करण्याचे आदेश सहधमार्दाय आयुक्त कार्यालयांना दिले आहेत.
देवस्थानच्या पुजार्यांना विश्वस्त म्हणून काम करता येणार नाही
विश्वस्तांनी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देऊ नये. तसेच देवस्थानचे पुजारी यांना विश्वस्त म्हणून काम करता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या धार्मिक स्थळांच्या जमिनी आहेत त्यांचे उत्पन्न देवस्थानला मिळतेय का हे पाहावे. जर देवस्थानच्या इनाम वर्ग 3 च्या जमिनी विक्री केल्या असतील तर ज्यांनी त्यांची विक्री केली त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच ते सर्व व्यवहार रद्द करण्यात येऊन जमिनी मूळ देवस्थानकडे परत येतील, अशी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय कार्यालयाने दिली.
ट्रस्ट म्हणून नोंद करणार
या परिपत्रकानुसार प्रत्येक गावातील धार्मिक स्थळांची माहिती तेथील सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून घेण्यात येत आहे. तसे पत्रही महसूल विभागाला देण्यात आले आहे. यानंतर संबंधित धार्मिक स्थळांना विश्वस्त नेमून त्यांची ट्रस्ट म्हणून नोंद करण्यात येणार आहे. यामुळे त्या देवस्थानच्या स्थावर मालमत्तेची देखरेख करण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक धार्मिक स्थळाची नोंद ट्रस्टमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी दिली.