धार्मिक एकोपा अबाधीत राहून गणेशोत्सवा व्हावा साजरा : पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे

 भुसावळ शहरात गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक

Bhusawalkar should celebrate Ganeshotsav keeping harmony : Superintendent of Police Dr. Praveen Mundhe भुसावळ : शहराचे नाव गुन्हेगारी क्षेत्रात घेतले जात असल्याने उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही शिवाय धार्मिक एकोपा कायम राहिल याचे नियोजन करून नियमांना अधीन राहून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे केले. भुसावळातील संतोषी माता हॉलमध्ये गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन गुरूवारी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले असता ते बोलत होते. बाप्पांच्या आगमनापूर्वी खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नायब तहसीलदार शोभा घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता घारूडे, पोलिस निरीक्षक राहु गायकवाड, पोलिस निरीक्षक गजानन पडघण, पोलिस निरीक्षक विलास शेंडे आदी उपस्थित होते.

उत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त होणार : मुख्याधिकारी
मातृभूमी गणेश मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी सांगितले की, विसर्जनाच्या मार्गावरील वायर, सर्व्हीस वायर वर कराव्यात, सराफ बाजार व परीसरात अंधार असल्याने उपाययोजना कराव्यात तसेच संतोषी माता पतसंस्थेजवळ पोलिस नेमून तेथून नंबरचे वाटप केल्यास गोंधळ होणार नाही. मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी सांगितले की, गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी गरजू मुलींना सायकल वाटप केल्यास हा आदर्श पायंडा पडू शकतो. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्याची दुरूस्ती केली जाईल, लाईटाची व्यवस्था केली जाईल, पालिकेच्या माध्यमातून कामे होतील, असेही त्यांनी सांगितले.

एकोप्याने पार पडावा उत्सव : प्रांताधिकारी
गणेशोत्सवाच्या काळात शहरात जातीय सलोखा राखणे अपेक्षित असून गणेशोत्सवाला गालबोट लागू नये तसेच सर्वांनी एकोप्याने राहून गणेशात्सव पार पाडावा, असे आवाहन प्रांताधिकारी सुलाणे यांनी केले. वीज कंपनीचे कार्यकारी अथीयंता पी.आर.घारूडे यांनी सांगितले की, प्रत्येक मंडळाने वीजपुरवठा घेण्यासाठी वीज कंपनीकडे अर्ज करून परवानगी घ्यावी, मूर्तीना वीज तारा लागू नये यासाठी वीज कर्मचारी वीज तारा वर करतील.

डीजेला परवानगी नाहीच : पोलिस अधीक्षक
डीजेला परवानगी नसल्याने डीजेचा वापर करू नये तसेच बेकायदेशीरपणे वाहने मॉडिफाईड करण्यात आल्याने अशी वाहने मिरवणुकीत दिसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी दिला. पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता डीजे वाद्य वाजविल्यास पोलिस सुध्दा वेगवेगळे नियम काढतील, त्यासाठी सर्वांनी पारंपारीक वाद्य लावून विसर्जन मिरवणूक पार पाडावी, असेही डॉ.मुंढे म्हणाले.

विसर्जन मार्गाची केली पाहणी
गणेश मंडळांतर्फे होणार्‍या विसर्जनाच्या मार्गाची पाहणी स्वत: डॉ. मुंढे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहुल गायकवाड, निरीक्षक गजानन पडघण, निरीक्षक विलास शेंडे, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक स्वप्निल नाईक आदी उपस्थित होते. नृसिंह मंदीरापासून डिस्को टॉवर, अप्सरा चौक, सराफ बाजार, अमर स्टोअर्स तेथून बाजारपेठ पोलिस ठाणे, दगडी पूल, गवळी वाडा, जळगाव रोड, गांधी पुतळा, तापी नदीवर जेथे विसर्जन होते तेथपर्यत डॉ. मुंढे यांनी स्वत: जाऊन पाहणी करीत सूचनाही केल्या.