अहमदाबाद : आगामी गुजरात निवडणुकीसाठी भाजप सोशल मीडियावर प्रचारासाठी नवीन व्हिडिओ प्रसिद्ध करत असून, यापैकी एका व्हिडिओवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आक्षेप या व्हिडिओवर घेण्यात आला आहे. अहमदाबादमधील अॅड. गोविंद परमार यांनी याबाबत निवडणूक आयोगात तक्रार केली आहे.
भीती निर्माण करण्याचा प्रयत्न
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने या नवा व्हिडिओद्वारे केला असून, धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा आरोप अॅड. परमार यांनी केला. या व्हिडिओच्या सुरूवातीला अजानचा आवाज येतो. त्याचदरम्यान एक मुलगी निर्जन रस्त्यावर भरभर चालताना दाखवली आहे. त्या मुलीचे कुटुंब घरी तिची काळजी करत असतात. घरी आल्यानंतर मुलीचे कुटुंब सुटकेचा निश्वास टाकत तिला जवळ घेतात. मुलीची आई व्हिडिओकडे पाहून, आपल्याला हे गुजरातमध्ये होत असल्याचे आश्चर्य वाटत आहे का? असा प्रश्न विचारते. नंतर मुलीचे वडील असा गुजरात 22 वर्षापूर्वी होता, आता ते सत्तेत आल्यास पुन्हा अशी स्थिती ओढावेल, असे म्हणतात. आपले मत, आपली सुरक्षा अशा आशयाच्या गुजराती संवादाने हा व्हिडिओ संपतो.
ह्युमन राईटस् लॉचा व्हिडिओला आक्षेप
भाजपचा हा व्हिडिओ मुस्लीम समाजाविरोधात असून याद्वारे चुकीचा प्रचार होत असल्याचा आरोप ह्युमन राईटस् लॉ नेटवर्कच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या जाहिरातीमुळे मुस्लिमांविरोधात दुष्पप्रचार करण्यात येत असून, त्यांच्याविरोधात घृणा निर्माण करण्यात येत असल्याचे गोविंद परमार यांनी म्हटले. याआधीदेखील भाजपच्या एका जाहिरातीत पप्पू शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्यावरदेखील आक्षेप घेण्यात आल्यानंतर तो शब्द वगळण्यास गुजरात निवडणुक आयोगाने सांगितले आहे.