खडकी । गणेश विसर्जनास दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप विसर्जन हौदातील गणेशमूर्ती संबंधीचा पुढील विधी योग्य प्रकारे न केल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मदन गाडे व गोपाळ नेटके यांनी गुरुवारी (दि.14) खडकी पोलिस ठाणे येथे दिली आहे. अनंत चतुर्दशीला (दि.5) गणपतीचे महादेववाडी घाट मुळा नदी पात्रात विसर्जन सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. नदीचे प्रदूषण टाळण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने नागरिकांकरिता येथे कृत्रिम विसर्जन हौदाची सुविधा उपलब्धकरून देण्यात आली होती. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतासाद देत गणपतींचे हौदात विसर्जन केले. विसर्जन सोहळ्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने या हौदामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकून मूर्तींचे विघटन झाल्यानंतर ती माती शेतात टाकावी असे ठरले आहे. परंतु विसर्जन हौदामध्ये रासायनिक पावडर टाकली नसल्यास दुसर्या दिवशी या हौदातील गणेश मूर्तींचे वाघोली येथील खाणीमध्ये विसर्जन करणे बंधनकारक असते.
विसर्जन सोहळ्यास दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप विसर्जन घाटाशेजारील हौदातील गणेशमूर्तींचा पुढील विधी बोर्डाने अद्याप न केल्याचे गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते गाडे व नेटके यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ खडकी पोलिस ठाण्यात हलगर्जीपणा करून लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक साळुंखे यांनी तत्काळ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधिकारी विलास खांदोडे यांच्याकडे या प्रकराची चौकशी केली. खांदोडे यांनी आपली बाजू मांडताना हौदामध्ये नियमाप्रमाणे रासायनिक पावडर टाकण्यात आली होती, मात्र मूर्ती न विरघळल्याने पुढील प्रक्रिया करण्यात अडचण निर्माण झाली असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर गुरुवारी दुपारी विसर्जित मूर्तींचे वाघोलीतील खाणीमध्ये विसर्जन करण्यात आल्याचे खांदोडे यांनी सांगितले. याबाबत गाडे म्हणाले, विसर्जन हौदात आवश्यक तेवढी रासायनिक पावडर टाकली होती का? याकामी बोर्डाचे व संबधित अधिकार्यांचे दुर्लक्ष झाले आहे. बोर्ड प्रशासनाने या प्रकरणी आपले काम योग्यरित्या केले असते तर पोलिसात तक्रार देण्याची वेळ आली नसती. दोषी अधिकारी बोर्ड प्रशासन कारवाई करीत नाही हा आजपर्यंतचा अनुभव असल्यानेच या प्रकरणी आम्ही बोर्डाकडे दाद न मागता पोलीस तक्रार केली.